Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा ‘सिव्हिल’ला ट्रॉमा केअर युनिट मंजूर; महाविकास आघाडीची सत्ता जाता-जाता सातारकरांसाठी सुविधा

सातारा / प्रतिनिधी : गरिबांचे आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी 50 बेडचे ट्रॉमा केअर युनिट मंजूर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातग्रस्त व

राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट
आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती
नगरपंचायतीत सत्ताधार्‍यांचा अनागोंदी कारभार; हर्षवर्धन शेळके-पाटील यांचा आरोप

सातारा / प्रतिनिधी : गरिबांचे आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी 50 बेडचे ट्रॉमा केअर युनिट मंजूर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातग्रस्त व तातडीच्या उपचारांची गरज असलेल्यांना योग्य व आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकालात तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी सत्तेतून जाता-जाता सातारकरांना ही सुविधा दिली आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील नागरिक तज्ज्ञ आरोग्य सुविधा घेण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर जिल्ह्यातून जवळपासून 90 किलोमीटरचा महामार्ग जातो. राज्य व जिल्हा मार्गांचेही मोठे जाळे आहे. या सर्व रस्त्यांवर दररोज कुठे ना कुठे अपघात होतात. गंभीर जखमी रुग्णांवर पहिल्या एक तासाच्या आत योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात मोलाची मदत होते. त्यामुळे अपघातग्रस्तांसाठी पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ समजला जातो.
या कालावधीत रुग्णांवर योग्य उपचार मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी 25 बेडचा स्वतंत्र ट्रॉमा केअर विभाग तयार केला होता. त्यासाठी रुग्णालयाला जादा कर्मचारी संख्याही वाढवून मिळाली होती. त्यामुळे अपघातग्रस्त, सर्पदंश किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी सोय झाली होती. परंतु, कोरोना संसर्गाच्या कालावधीत या विभागाचे चित्र बदलून गेले. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ट्रॉमा केअरसाठी बनवलेल्या वॉर्ड व ऑपरेशन थिएटरमध्ये कोरोना बाधितांसाठी उपचार करावे लागले. त्यामुळे रुग्णालयातील अपघात विभाग हा पुन्हा जुन्या इमारतीत बाह्यरुग्ण विभागाजवळ सुरू केला. त्यामुळे आधीच उपलब्ध बेड व येणार्‍या रुग्णांचे व्यस्त प्रमाण असलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांची परवड होत होती. त्यामुळे अजित पवार यांनी ही सुविधा सातारकरांसाठी दिली आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधींनीही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याची त्यांनी दखल घेत जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मंजूर केला. त्याबाबतचा अध्यादेशही निघाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या अडीचशे बेडच्या मंजूर क्षमतेत दररोज साधारणपणे साडेतीनशे रुग्ण दाखल असतात. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळण्यात अनेकदा अडचणी येतात. काही वेळा रुग्णांना नाईलाजाने डिस्चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास अशा अडचणी येणार नाहीत.

COMMENTS