Homeताज्या बातम्या

नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची धडक कारवाई; अल्पवयीन मुलीची सुटका, भ्रमणध्वनी चोरास अटक

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने ’बालसंरक्षण मोहीम’ आणि ’प्रवासी सुरक्षा मोहीम’ अंतर्गत जालना व परभणी रेल्वे स्थानकां

मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार16 मे रोजी आंदोलनाची दिशा ठरणार
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात



दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने ’बालसंरक्षण मोहीम’ आणि ’प्रवासी सुरक्षा मोहीम’ अंतर्गत जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर उल्लेखनीय कारवाया करत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली, भ्रमणध्वनी चोरीच्या आरोपीला अटक केली तसेच चार संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले.
जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला शिपाई कोमल बडोगे यांनी गस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणारी 15 वर्षीय मुलगी आढळून आली. चौकशीत ती पालकांना न सांगता घरातून निघून आल्याचे समोर आले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने बाल सहाय्य क्रमांक 1098, पालक आणि सरकारी रेल्वे पोलिसांना माहिती देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. मुलीला सुरक्षितपणे बाल सहाय्य कक्षाच्या प्रतिनिधींच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ’प्रवासी सुरक्षा मोहीम’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे गुप्तवार्ता शाखा आणि सरकारी रेल्वे पोलीस, परभणी यांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे भ्रमणध्वनी चोरीच्या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून गुंटूर एक्सप्रेसमधून चोरीला गेलेला 15 हजार 999 रुपयांचा सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याच मोहिमेत परभणी रेल्वे स्थानकावर नगरसूल-काचीगुडा एक्सप्रेसच्या सामान्य डब्याजवळ संशयास्पद हालचाली करणार्‍या चार संशयित चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास रेल्वे सुरक्षा सहाय्य क्रमांक 139 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या रेल्वे सुरक्षा दल अथवा रेल्वे अधिकार्‍यांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

COMMENTS