Homeताज्या बातम्यासंपादकीय

माध्यम नायक बबनराव कांबळे !

प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या गर्दीत वेगळी वाट चोखाळत, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र प्रसारमाध्यम निर्मिती प्रक्रियेत दैनिक सम्राट या व

संसदेतही सडकावरचे अनुकरण!
अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!

प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या गर्दीत वेगळी वाट चोखाळत, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र प्रसारमाध्यम निर्मिती प्रक्रियेत दैनिक सम्राट या वृत्तपत्राची उभारणी करणारे बबनराव कांबळे यांचे अकाली निधन, हे फुले, शाहू, आंबेडकरी प्रसार माध्यमांच्या शृंखलेत पोकळी निर्माण करणारे आहे. साधारणत: 22 वर्षांपूर्वी ठाणे आणि मुंबईच्या दादर येथून सुरू झालेले दैनिक सम्राट, हे दैनिक अगदी थोड्याच कालावधीत लाखांच्या खपापर्यंत पोहोचले होते. सुरुवातीच्या  काळात बबन कांबळे आणि आंबेडकरी समाज यांच्यामध्ये प्रचंड मोठा ऋणानुबंध निर्माण झाला होता; याची परिणती दैनिक सम्राट च्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात दिसून आली होती. समाज बांधवांनी आपल्याकडे असेल ते दान देऊन दैनिक सम्राटला मोठे करण्याचे आपले सामाजिक आणि आर्थिक दायित्व निभावले होते.

यानंतर या दैनिकाने मागे वळून पाहिले नाही. सम्राट आणि बबन कांबळे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. कोणत्याही दैनिकाला अगदी पहाटेच वाचकांच्या हातात पोहोचविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. मात्र, या स्पर्धेच्या काळातही दैनिक सम्राट हे दुपारी दोन वाजे नंतर देखील वाचकांपर्यंत पोहोचले तरी, त्याचे स्वागत होत असे! कारण, या दैनिकाने सामाजिक सर्वहारा समाजातून आपले प्रतिनिधित्व आणले होते. मध्यम बांधा, गौरवर्ण आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेले बबन कांबळे हे समोरच्याशी बोलताना नेहमीच नम्रपणे बोलत असत. मात्र, दैनिक सम्राट ला जसे जसे यश लाभत गेले, तसतसे बबन कांबळे यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या मध्यमवर्गीय अधिकार्‍यांच्या आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले. हळूहळू या दोघांमध्ये दरी रुंदावली. अर्थात, त्याचा कोणताही परिणाम दैनिक सम्राट वर झाला नाही. याउलट बबन कांबळे यांच्या संपादकत्वाखाली हे दैनिक वाढतच राहिले. परंतु दुसर्‍या बाजूला सरकारी मध्यमवर्ग असणार्‍यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने अडथळे आणण्याचे काम केले. अर्थात सम्राट आणि समाज यांच्या मधल्या संबंधाविषयी लिहिण्यासाठी ही जागा नाही. तर, चळवळीत प्रसार माध्यमाचा नव्याने इतिहास रचणारे व्यक्तिमत्व म्हणून बबन कांबळे यांच्याकडे आपल्याला पहावं लागेल

. बबन कांबळे यांनी केलेल्या या साहसानंतर, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेला पुढे नेणारी प्रसारमाध्यमे यानंतरच्या काळात अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. अर्थात, महाराष्ट्रात फुले- शाहू – आंबेडकरी नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. ही परंपरा महात्मा फुले यांच्यापासून सुरू होते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीतच चार वेगवेगळ्या नावांची नियतकालिके चालवून हा इतिहास समृद्ध केला. परंतु, पुढे चालून नियतकालिकांचे दैनिकात रुपांतर होण्यासाठी एक दीर्घ काळ जावा लागला. त्याची एक चांगली आणि मोठी सुरुवात बबन कांबळे यांच्या नेतृत्वात सम्राट च्या माध्यमातून झाली. बबन कांबळे यांच्या मागे समाज एकसंघपणे उभा राहिला होता. त्याचे हे देखील एक कारण होते की, फार मोठ्या कालावधीनंतर प्रथमच एका दैनिकाची उभारणी झाली होती. अर्थात, एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे हे तितके कठीण नाही जेवढे  त्याला टिकवणे कठीण असते. कोणतीही नवी उभारणी करताना जेवढ्या जलद पद्धतीने जनसमर्थन प्राप्त होते, ते नंतरच्या काळात तेवढ्याच तीव्रतेने ओसरत असते. एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक आणि माध्यमांच्या चळवळींचाही हाच इतिहास आहे. बबन कांबळे यांनी सम्राट सुरू करून जवळपास 22 वर्षांचा कालावधी लोटला. अलीकडच्या काळात एक संपादक म्हणून त्यांचा दबदबा ओसरला असला तरी, त्यांनी निर्माण केलेला इतिहास हा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये चिरस्मरणात राहील! बबनराव कांबळे यांना आदरांजली.

लोकमंथन परिवाराकडून कलकथित बबनराव कांबळे यांना आदरांजली. संपादक-अशोक सोनवणे

COMMENTS