ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडला !

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडला !

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे विश्‍लेषण करणे सुरू झाले आहे. मात्र या निकालानंतर पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्

पवारांचे संभ्रमाचे राजकारण
केंद्राविरुद्ध दिल्ली संघर्ष पेटणार
‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
The current image has no alternative text. The file name is: Agralekh.jpg

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे विश्‍लेषण करणे सुरू झाले आहे. मात्र या निकालानंतर पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राजकारण संपल्यागत जमा आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडल्याचे दिसून येत आहे. तब्बल 15 वर्षांपूर्वी पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर येण्यासाठी अप्रत्यक्षपणे भाजपनेच मदत केली होती. मात्र 15 वर्षांमध्ये ममतादीदींनी एकहाती सत्ता हाती घेत ना भाजपला मोजले ना, काँगे्रसला. दोन्ही पक्षांसोबत अंतर राखून ममतादीदींनी आपले राजकारण केले. ज्या भाजपने 15 वर्षांपूर्वी पश्‍चिम बंगालमध्ये मममादीदींची सत्ता आणण्यासाठी हातभार लावला, त्याच भाजपने ही सत्ता काढून घेतली. तब्बल 200 पेक्षा अधिक जागा मिळवत ही निवडणूक एकतफी झाल्याचा संदेश जनतेने ममतांना नाकारल्याचे या जनादेशातून स्पष्ट होत आहे. भाजपने 206 जर तृणमूल कॉँगे्रसने केवळ 80 जागा मिळवल्या आहेत. जागांचा फरक अमाप असला तरी, पक्षाला मिळालेल्या मतांचा विचार करता तृणमूल कॉँगे्रसला तब्बल 2 कोटी 60 लाख 13 हजार 379 मते पडली आहेत, तर भाजपला 2 कोटी 92 लाख 24 हजार 167 मते पडली आहेत. यावरून दोन्ही पक्षांचा विचार करत केवळ 32 हजार मतांचा फरक असला तरी जागांमध्ये 125 जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडल्याचे दिसून येत आहे. ममतादीदींनी जरी काँगे्रससोबत आघाडी केली असती, तरी या राज्याचे चित्र वेगळे दिसले असते. मात्र ममतादीदींनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड पाडून स्वतःचा गड उद्ध्वस्त करून घेतला आहे. एसआयआरचा मोठा फटका बसल्याचे देखील यातून दिसून येत आहे.
पश्‍चिम बंगालचा हा निकाल दीर्घकालीन सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक प्रक्रियेचा परिपाक आहे. अनेक दशकांपासून विशिष्ट राजकीय संस्कृतीत अडकलेल्या बंगालमध्ये झालेला हा बदल व्यापक परिणाम घडवणारा ठरणार आहे. या परिवर्तनामागे केवळ निवडणुकीतील प्रचार नव्हता, तर एक सुसूत्र आखणी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जमिनीवर केलेले सूक्ष्म नियोजन हे घटक निर्णायक ठरले. या विजयाच्या केंद्रस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले जाते. त्यांनी या निवडणुकीकडे केवळ राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता, एक व्यापक ‘मिशन’ म्हणून पाहिले. पंधरा दिवसांहून अधिक काळ त्यांनी बंगालमध्ये तळ ठोकून राहून प्रचाराची सूत्रे हाताळली. दिवसभर सभा, रस्त्यांवरील प्रचार आणि जनतेशी संवाद साधल्यानंतर रात्री प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणे, स्थानिक स्तरावरील माहिती संकलित करणे आणि पुढील दिवसाची रणनीती आखणे-ही त्यांची कार्यपद्धती होती. यामुळे प्रचार केवळ भावनिक पातळीवर न राहता, अत्यंत नेमके आणि परिणामकारक ठरला. या प्रक्रियेत ‘सूक्ष्म व्यवस्थापन’ हा महत्त्वाचा घटक ठरला. प्रत्येक मतदान केंद्र, प्रत्येक परिसर आणि प्रत्येक सामाजिक गट यांचा वेगळा अभ्यास करून त्यानुसार प्रचाराची आखणी करण्यात आली. पन्नासहून अधिक सभा आणि रोड शोद्वारे व्यापक जनसंपर्क साधला गेला, तर दुसरीकडे पाच प्रमुख नेत्यांची एक कोर टीम प्रत्येक आघाडीवर लक्ष ठेवून होती. या टीमने स्थानिक पातळीवरील अडचणी ओळखून तातडीने उपाययोजना केल्या, ज्यामुळे प्रचारातील सातत्य टिकून राहिले. केवळ निवडणुकीच्या काही आठवड्यांतील प्रयत्नांमुळे हा विजय मिळाला असे मानणे चुकीचे ठरेल. यामागे दीर्घकालीन संघटनात्मक कामाची भक्कम पायाभरणी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेने गेल्या दीड दशकात बंगालमध्ये आपले जाळे सातत्याने वाढवले. 2011 साली सुमारे 530 शाखा असलेल्या या संघटनेच्या शाखांची संख्या आता 2500 पेक्षा अधिक झाली आहे. ही वाढ केवळ आकड्यांची नसून, समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची क्षमता वाढवणारी ठरली. 2011 नंतर बंगालमध्ये झालेल्या राजकीय बदलांनंतरही संघाने आपले काम शांतपणे, पण सातत्याने सुरू ठेवले. विशेषतः 2021 नंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर संघाने ‘सुरक्षा कवच’ म्हणून भूमिका बजावली. हिंसाचारग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे संघटनेबद्दल विश्‍वास निर्माण झाला आणि आपल्यासोबत कोणी तरी आहे ही भावना लोकांमध्ये दृढ झाली. याशिवाय, काही संवेदनशील भागांमध्ये थेट संघर्ष टाळून विश्‍वासावर आधारित रणनीती अवलंबण्यात आली. महिलांशी आणि पीडित घटकांशी संवाद साधून त्यांना स्वतःचा आवाज उचलण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभाग वाढला आणि राजकीय चर्चेत नवे मुद्दे समोर आले. ही पद्धत केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, समाजातील बदलत्या अपेक्षांचे प्रतिबिंब ठरली. सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरही मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले. स्थानिक सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रादेशिक ओळख यांचा आधार घेत, स्वतःला ‘बाहेरील’ पर्याय म्हणून नव्हे तर ‘स्थानिक’ पर्याय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला. स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांच्या विचारांशी स्वतःला जोडून घेतले गेले. या माध्यमातून बंगालच्या अस्मितेला साद घालण्यात आली, जी राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरली. मतदारांमध्ये भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. गावागावांत आणि वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यकर्त्यांना मतदान केंद्रांपर्यंत मतदारांना पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली. यामुळे मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष सहभाग वाढला आणि मतांमध्ये रूपांतर होण्यास मदत झाली. या सर्व प्रक्रियेत जमिनीवरील माहिती सातत्याने पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचत राहिली, ज्यामुळे निर्णय अधिक अचूक झाले. राजकीय मुद्द्यांची मांडणी देखील या विजयात महत्त्वाची ठरली. शिक्षक भरतीसारख्या प्रकरणांपासून ते इतर घोटाळ्यांपर्यंतचे मुद्दे केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित ठेवले नाहीत, तर त्यांना सामान्य कुटुंबांच्या भविष्यासोबत जोडले गेले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न, तरुणांच्या रोजगाराच्या संधी आणि मध्यमवर्गाच्या अपेक्षा-या सर्व मुद्द्यांना एकत्रितपणे मांडण्यात आले. यामुळे असंतोष केवळ भावना न राहता, तो मतांमध्ये परिवर्तित झाला. या सर्व घटकांचा विचार केला तर बंगालमधील हा विजय एक ‘बहुस्तरीय रणनीती’चा परिणाम असल्याचे स्पष्ट होते. निवडणूक प्रचार, संघटनात्मक विस्तार, सामाजिक संवाद, सांस्कृतिक जोड आणि प्रभावी नेतृत्व-या सर्वांचा संगम येथे दिसून येतो. यामुळेच हा निकाल केवळ एका राज्यापुरता मर्यादित न राहता, देशाच्या व्यापक राजकारणावरही प्रभाव टाकणारा ठरू शकतो.

COMMENTS