मढीच्या कानिफनाथांचा केला चक्क वाढदिवस…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढीच्या कानिफनाथांचा केला चक्क वाढदिवस…

समाधीजवळ कापला केक, सात महिन्यांनी उघड झाला प्रकार

अहमदनगर/प्रतिनिधी : भटक्यांची पंढरी असा लौकिक असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे नवनाथांपैकी असलेल्या कानिफनाथांचा चक्क केक कापून वाढदिवस झाला आहे

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा – ना.बाळासाहेब थोरात
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग

अहमदनगर/प्रतिनिधी : भटक्यांची पंढरी असा लौकिक असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे नवनाथांपैकी असलेल्या कानिफनाथांचा चक्क केक कापून वाढदिवस झाला आहे. अर्थात ही घटना सात महिन्यांपूर्वीची म्हणजे 12 ऑगस्ट 2021 रोजीची आहे. पण मढी देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाच्या वादातून ही आता उघड झाली आहे. नवनाथ हे प्रगट झालेले आहेत, त्यांच्या जन्मतारखेबाबत वा तिथीबाबत कोणत्याही पोथ्या पुराणात कोणताही उल्लेख नाही. असे असताना मढी देवस्थानच्या विश्‍वस्तांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी कानिफनाथांच्या मढी येथे नाथांच्या समाधीस्थळाच्या आकाराचा केक आणून तो कापला कसा, असा सवाल या देवस्थानचे माजी विश्‍वस्त मुंबई येथील सुनील सानप व नगर येथील डॉ. रमाकांत मडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
सानप व मडकर यांनी मढी देवस्थानच्या कारभारावर अनेक आक्षेप घेतले असून, याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असा दावा केला आहे. औरंगाबाद खंडपीठात देवस्थानच्या विश्‍वस्त निवडीबाबत याचिका दाखल आहे. मात्र, नगरच्या उपधर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निकालावर खंडपीठाच्या याचिकेचे कामकाज होणार आहे. त्यामुळे विश्‍वस्त मंडळ नियुक्ती करून खंडपीठाचा अवमान केल्याची तक्रार पुढच्या सुनावणीच्यावेळी करण्यात येणार असल्याचे सानप यांनी सांगितले. सानप यांनी सांगितले की, मुंबईच्या मुख्य धर्मादाय आयुक्तांकडे मढी देवस्थानातील गैरकारभाराची चौकशी करण्याची तक्रार केली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात देवस्थान बंद असताना झालेली नोकर भरती, केलेला अवास्तव खर्च, देवस्थानच्या पैशांतून मढी ग्रामपंचायतीची झालेली विकास कामे, देवस्थानजवळील अतिक्रमणे, वृक्षारोपणासाठीचा अवास्तव खर्च व अन्य कामांतून गैरव्यवहार झाला आहे. देवस्थानची वार्षिक उलाढाल सुमारे तीन ते साडेतीन कोटींची असून, तेथे सुरू असलेल्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यावर मुख्य धर्मादाय आयुक्तांनी पुण्याच्या सह आयुक्तांना चौकशीचे व आवश्यक कारवाईचे आदेश देऊन तक्रारदारांना कळवण्याचे सांगितले होते. पण आम्हाला आजपर्यंत काहीही कळवले गेलेले नाही, असे सानप यांनी सांगितले.

भाविकांमध्ये संताप
श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधीसमोर समाधीच्या आकाराचा केक ठेवून नाथांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम करण्याचा प्रताप विद्यमान विश्‍वस्त मंडळाने केला. त्यामुळे नाथ भक्तांमधून संतापाची लाट उसळली आहे. नवनाथांचा जन्मदिन कोणासही माहिती नसताना स्वतः मनाने ठरवून केक नाथांसमोर ठेवणे व पाश्‍चात्य संस्कृतीस साजेसे कृत्य करणे म्हणजेच नाथसंप्रदायाचा अभ्यास नसलेली मंडळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशी आधारे धर्मदाय उपायुक्तांनी विश्‍वस्त म्हणून निवडली की, अशा चुकीच्या प्रथा पाडण्याचा प्रकार घडणारच, असा दावा करून सानप म्हणाले, आता हिंदू राष्ट्रसेनेचे धनंजयभाई देसाई यांची भेट घेऊन देवस्थान वाचवण्याचा लढा दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून, आंदोलन स्थगित
मढी देवस्थानच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीबाबत दिलेल्या तक्रारींवर काहीही कारवाई होत नसल्याने आज गुरुवारी 17 मार्च रोजी नगरला आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी सण-उत्सवानिमित्त पाच दिवस जमावबंदी आदेश जारी केल्याने त्या आदेशाचा मान राखून आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, 8-10 दिवसांनी हे आंदोलन करणार असल्याचे सानप यांनी सांगितले.

राजकीय धुळवड रंगात
मढीची यात्रा होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवारपासून सुरू झाली असून, कोरोना सावटामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली यात्रा यंदा होत असल्याने देशभरातून भाविक येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी आले आहेत. येत्या 2 एप्रिलपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. यानिमित्ताने देवस्थानच्या कारभाराची राजकीय धुळवड भाविकांमध्ये चर्चेची झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे देवस्थान विश्‍वस्त मंडळाला आशीर्वाद असून, या लोकप्रतिनिधींचाही वाढदिवस देवस्थान परिसरात झाला असल्याचा दावा सानप व डॉ. मडकर यांनी केला. मात्र, या लोकप्रतिनिधीचे स्पष्ट नाव घेण्यास नकार दिला.

COMMENTS