‘लॉकडाऊन’ जनावरांचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘लॉकडाऊन’ जनावरांचे

दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ इतका भयंकर होता की, लोक घरांच्या बाहेर निघण्यास भयभीत होते. घराबाहेर पड

भाजपचे धक्कातंत्र !
उशिरा सुचलेलं शहाणपण
माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा

दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ इतका भयंकर होता की, लोक घरांच्या बाहेर निघण्यास भयभीत होते. घराबाहेर पडलो, आणि कोरोना घेऊन आलो तर, ही भीती मनात होतीच. स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी रांगा लावल्याचे यानिमित्ताने दिसून आले. इतकी दहशत या कोरोनाची होती. त्यानंतर आलेला मंकी पॉक्स, ओमायक्रॉन, या सर्वांवर आपण यशस्वीरित्या मात केलेली आहे. मात्र जनावरांमध्ये आता लम्पी नावाचा त्वचेचा एक नवीनच रोग आला आहे. यासाठी जनावरांचे लसीकरण सुरु असले तरी, या लम्पीचे प्रमाण विविध राज्यात वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत 7,300 हून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजारामुळे मृत्यू होणार्‍या पशूची संख्या अशीच वाढत राहिली तर देशातील पशुसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच याचा परिणाम दूधावर देखील होऊ शकतो. पशुंचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे लम्पी रोगांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आपले निरोगी जनावरे बाहेर आणू नका, त्यांना लॉकडाऊन करा, असे फर्मानच पशुसंवर्धन विभागाने काढले आहे. त्यामुळे आता काही काळासाठी जनावरे देखील लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
जनावरांचे लॉकडाऊनची घोषणा अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे. त्यामुळे आता जनावरांचे बाजार, यात्रा भरवता येणार नाही. थोडक्यात मोठया प्रमाणावर जनावरे एकत्र आणता येणार नाही. एकप्रकारे जनावरांचे हे लॉकडाऊन असल्याचे दिसून येते. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली असून सर्व शेतकरी व पशुपालकांना प्राण्यांचे त्वरित लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात देखील लम्पीचा रोग मोठया वेगाने पसरतांना दिसून येत आहे. तो आतापर्यंत जवळपास 20 जिल्ह्यामध्ये पसरला असून, तो आणखी जिल्ह्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लम्पी हा आजार प्राण्यांपासून मानवात पसरत नाही, त्यामुळे त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र गुरांना स्वच्छ ठेवणे, गोठा स्वच्छ ठेवणे, वेळीच प्राण्यांना लस देणे, या बाबींची काळजी शेतकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्राण्यांना याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे गायींना आणि म्हशींना एकाच गोठयात ठेवू नये, त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. लम्पीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने विविध जिल्ह्यात धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून फिरते दवाखाने सुरु करण्याची गरज आहे. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नमुना संकलन करून लम्पी रोगाचे जनावरे शोधून काढल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होईल. या माध्यमातून लम्पी रोगांचा प्रादूर्भाव रोखता येईल, आणि जनावरांचे लॉकडॉऊन देखील टाळता येईल.

COMMENTS