कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्षा रोहिणी घुले यांना पदावरून हटविण्यासाठी एकत
कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्षा रोहिणी घुले यांना पदावरून हटविण्यासाठी एकत्र आलेले सभापती राम शिंदे आणि आ. रोहित पवार समर्थक नगरसेवक आता उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेहत्रे यांच्याविरोधातही आक्रमक झाले असून, त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून, १५ जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेचच नगराध्यक्ष छाया शेलार यांच्याकडे अविश्वासाचे पत्र गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी देत उपनगराध्यक्ष वरील अविश्वासची घोषणा केली.या राजकीय घडामोडींचे सूत्रधार म्हणून गटनेते प्रा. सतीश पाटील यांचे नाव पुढे येत आहे. त्यांच्या पुढाकाराने तब्बल १३ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. नगराध्यक्ष छाया सुनील शेलार यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यात उपनगराध्यक्षांनी एकाधिकारशाही पद्धतीने कारभार केल्याचा, विकासकामांमध्ये दुजाभाव केल्याचा आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रस्तावाची दखल घेत शेलार यांनी १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील तरतुदीनुसार होणाऱ्या या सभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असून, सभेचे कामकाज नगराध्यक्षा स्वतः पीठासीन अधिकारी म्हणून पाहणार आहेत.१५ जुलैच्या विशेष सभेत आवश्यक बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना पद गमवावे लागणार आहे. त्यामुळे ही सभा केवळ एका पदाचा निर्णय घेणारी नसून, कर्जत नगरपंचायतीतील पुढील सत्तासमीकरणाची दिशा ठरविणारी ठरणार आहे. पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या निर्णायक सभेकडे लागले आहे.

COMMENTS