राज्यपालांचा मराठीद्वेष

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्यपालांचा मराठीद्वेष

स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राला जितके राज्यपाल लाभले, त्यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल म्हणून इतिहास भगतसिंग कोश्यारी यांची नोंद घेईल.

तालिबान्याचा उठाव आणि काबूलचा पाडाव
ड्रग्जच्या विळख्यात राज्य
सरकारची दुहेरी कोंडी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राला जितके राज्यपाल लाभले, त्यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल म्हणून इतिहास भगतसिंग कोश्यारी यांची नोंद घेईल. राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त असतात. म्हणजेच ते राष्ट्रपतीचे दूत म्हणून कामकाज पाहत असतात. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. अशावेळी राज्यपालच जर वादग्रस्त विधान करत असेल, तर त्यांनी त्यांचा मेंदू तपासून पाहण्याची खरी गरज आहे. पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सावित्रीमाई फुले यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणारे विधान करणारे राज्यपाल महोदयांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मराठी भाषिकांचा अपमान करणारे विधान केले. मुंबई आणि ठाण्यातून जर गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबईला कोण देशाची आर्थिक राजधानी म्हणेल, असा सवाल केेला. राज्यपाल महोदयांना मुंबई आणि ठाणे, गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या भरवश्यावर आर्थिक प्रगती करत असल्याचे म्हणावयाचे यातून दिसून येते. स्वतंत्र भारताचा इतिहास बघितला तर, मुंबई शहराचा विकास करण्याचे सर्वात मोठे श्रेय नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना जाते. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर एल्फिस्टन यांच्या सहकार्याने नानांनी मुंबईत शाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. याचबरोबर बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातंतून शिक्षणाची जाळे विणले. आत्ताचे ग्रँट मेडिकल कॉलेज, ज्याला आपण जेजे हॉस्पिटल म्हणतो, त्यामागे नानांचे मोठे योगदान होते. डॉ. भाऊ दाजी लाड, मोडक या सर्वांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसाठी आपले मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुंबईवर मात्र गुजरात्यांचे आक्रमण होऊ लागले. कारण मुंबई हे विकसित शहर, त्याचप्रमाणे या शहरात अनेक उद्योगधंदे असल्यामुळे अनेक गुजरात्यांनी मुंबईत आपले बस्तान हलवले. ज्याप्रमाणे आजही मुंबईत उत्तरप्रदेश आणि बिहारमधून लोंढेंच्या लोंढे काम शोधण्यासाठी येतात, त्याचप्रमाणे एकेकाळी या गुजरात्यांनी मुंबईमध्ये कामगार म्हणून आले, आणि व्यापारी झाले. गुजरात्यांचे मराठी माणसांवर होणारे आक्रमण थोपवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना केली. मराठी माणसांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्कांचा मान-सन्मान मिळाला पाहिजे, त्याची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, त्यांनी नोकर्‍या करण्यापेक्षा उद्योगधंद्यामध्ये स्थिरस्थावर झाले पाहिजे, याचबरोबर त्यांनी आत्मसन्मान जपला पाहिजे, या उदात्त हेतूने शिवसेनेची स्थापना झाली. त्यामुळे मुंबई कुण्या गुजराती किंवा राजस्थानी माणसांच्या आश्रयावर मोठी झाली नाही. ती मराठी माणसांच्या श्रमावर आणि कष्टावर जोमाने उभी आहे. मुंबईमध्ये अनेक उद्योजक आले, कारण त्यांना सर्व सोयी-सुविधा महाराष्ट्राने दिल्या. अशावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जर मराठी भाषिकांचा द्वेष करत असेल, तर राज्यपाल महोदयांची उचलबांगडी करणे आवश्यक आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यपाल महोदयांनी नेहमीच आघाडी सरकारसोबत असहकार्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले असून, शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे तरी राज्यपालांची ही मळमळ थांबेल असे वाटले होते. मात्र त्यांचा मराठीद्वेष काही केल्या लपून राहत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे सर्वच थरांतून निषेध होत आहे. एव्हाना भाजप, राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेना या सर्वच पक्षांतील नेत्यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतला आहे. मराठी अस्मितेला धक्का लावणारे विधान महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नसल्याचे मराठी माणसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. राज्यपाल महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागण्याची गरज आहे, अन्यथा सरळ-सरळ पायउतार होण्याची गरज आहे.

COMMENTS