Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये दूध दरासाठी किसान सभेचे आंदोलन

दुधाला किमान 34 रुपये दर देण्याची मागणी

संगमनेर ः राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान 34 रुपय

कृषिपंप वीज देयकांच्या दुरुस्ती शिबिराला ग्राहकांचा प्रतिसाद ; अहमदनगर जिल्ह्यात ८५२ ग्राहकांचा सहभाग
निळवंडेचे खुले कालवे व चार्‍या लाभक्षेत्रासाठी वरदान ः विलास गुळवे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

संगमनेर ः राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले.
शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह सतीश देशमुख, सदाशिव साबळे, ज्योतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वदक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे या प्रमुख नेत्यांसह शेकडो दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत व्हावी यासाठी सरकारने दूध दर प्रश्‍नी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी राज्यभर शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर संगमनेरमध्ये देखील अशाच प्रकारचे दूध ओतून आंदोलन करण्यात आले. दुग्धोत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुधाला किमान 34 रुपये भाव द्यावा यासाठी शासन आदेश काढला. मात्र खासगी व सहकारी संस्थांनी शासनाचा हा आदेश धुडकावून लावला आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारने तातडीने कारवाई करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी आंदोलकांनी मागणी केली. दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा, पशुखाद्याचे भाव कमी करावेत, मिल्को मिटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करावी, दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात या मागण्या यावेळी करण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील दुध उत्पादक आंदोलनात मोठ्या संखेने सामील झाले होते. संगमनेर येथील किसान सभेच्या कार्यालयात सुरूवातीला शेतकरी जमा झाले. त्यानंतर संगमनेर शहरातून मोठा मोर्चा काढत शेतकर्‍यांनी सकाळी 11.30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयाकडे कूच केले. सरकारचा आणि दूध कंपन्यांचा निषेध करणार्‍या घोषणा देत हा भव्य मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रांत कार्यालयाच्या दारात दुध ओतून यावेळी आंदोलनाल करण्यात आले. दुधातील दराच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्‍चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच  सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला 34 रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. 34 रुपयाऐवजी बेस रेट 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. दुध संघ व दुध कंपन्या संगनमत करून हे दर पाडत असून या लुटमारीला लगाम लावण्यासाठी व पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी डॉ. अजित नवले यांनी सांगितले. सरकारने तरीही दाद दिली नाही तर मंत्रालयात दुध ओतावे लागेल, असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव सदाशिव साबळे यांनी दिला. मोर्चामध्ये दुध उत्पादकांच्या सोबतच बांधकाम कामगार व  वन जमीन धारकही मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्याही मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी संगमनेर यांना देण्यात आले.

COMMENTS