“त्या” अदृश्य हातांमध्ये नगरचे संग्राम जगताप? : फडणवीसांनी मानलेल्या आभाराची चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“त्या” अदृश्य हातांमध्ये नगरचे संग्राम जगताप? : फडणवीसांनी मानलेल्या आभाराची चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : नव्या राज्य सरकारमधील विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी गैरहजर राहणारे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सोमवारी मात्र मुख्यमं

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार
कोपरगाव नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
कोरोनामुक्त गावांना लाखोंची बक्षिसे आणि योजनाही!

अहमदनगर/प्रतिनिधी : नव्या राज्य सरकारमधील विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी गैरहजर राहणारे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सोमवारी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहिले. मात्र, विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी हजर राहून मतदान करणारे नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मात्र सोमवारी विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी अनुपस्थित होते. या पार्श्‍वभूमीवर, विश्‍वासदर्शक ठरावावर आभार व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारला बाहेर राहून अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या अदृश्य हातांबद्दल आभार मानले. त्यामुळे अनुपस्थितांतील नगरच्या संग्राम जगताप यांचा या अदृश्य हातांमध्ये समावेश आहे काय, याची चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्यावेळी झालेल्या मतदानात नगर जिल्ह्यातील 11 आमदारांनी मतदान केले. यात भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 2 व एक अपक्ष-शिवसेना आमदार होते. राष्ट्रवादीचे एक आमदार लंके अनुपस्थित होते. ते आजारी असल्याने येऊ शकले नाही, असे सांगण्यात आले. पण कोरोना काळात बिनधास्तपणे रुग्ण व नागरिकांमध्ये फिरणारे लंके हे राज्यातील राजकीय आखाडा रंगात आला असताना अनुपस्थित कसे राहतात, यावरून संशय व्यक्त झाला व त्यांच्या अनुपस्थितीची व त्यामागील कारणांची चर्चा सोशल मिडियातून व्हायरल झाली. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील विश्‍वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी आ. लंके आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी पक्षादेशाप्रमाणे या ठरावाच्या विरोधात मतदानही केले. यावेळी त्यांच्यासह बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, डॉ. किरण लहामटे, आशुतोष काळे, लहू कानडे व शंकरराव गडाख यांनी ठरावाच्या विरोधात तर राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते व मोनिका राजळे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. या सगळ्या गदारोळात रविवारच्या प्रमाणे सोमवारीही नगर जिल्ह्यातील 12 आमदारांपैकी 11 आमदारांनीच मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप सोमवारी अनुपस्थित होते. त्यामुळे ते का अनुपस्थित राहिले, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांच्याकडून त्यांच्या अनुपस्थितीचा खुलासा झाला नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खुलासा करताना, मतमोजणीला सुरुवात झाल्याने विधानसभा सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यासह माजी मंत्री विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप यांना सभागृहात मतदानाला येता आले नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, दरवेळी विश्‍वासदर्शक ठरावावर आधी चर्चा होते व मग मतदान होते, पण यावेळी आधी मतदान घेण्यात आले व त्यासाठी आम्हाला यायला दोन-तीन मिनिटे उशीर झाला, त्यामुळे मतदानात भाग घेता आला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर लगेच विश्‍वासदर्शक प्रस्ताव मांडला गेला व त्यावर आवाजी मतदान झाले. पण मतांच्या विभागणीची मागणी सभागृहातून झाल्याने मग प्रत्यक्ष पाठिंबा मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आधीच्या आवाजी मतदान प्रक्रियेचीही माहिती अनुपस्थितांना झाली नाही काय, असा संशय निर्माण झाला आहे व त्यामुळे नगरच्या जगतापांसह या सर्वांची अनुपस्थिती चर्चेची झाली आहे.

फडणवीसांच्या वक्तव्याने संभ्रम
सभागृहात वेळेत येता आले नाही म्हणून आ. जगताप यांना मतदान करता आले नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. विश्‍वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर केल्याबद्दल त्यांनी सभागृहाचे आभार मानले व यावेळी बोलताना त्यांनी, अप्रत्यक्षपणे बाहेर राहून मदत करणार्‍या त्या अदृश्य हातांचेही मनापासून आभार, असे वक्तव्य केल्याने आ. जगतापांसह अन्य अनुपस्थितांची गैरहजेरी ठरवून होती काय? व त्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचा अदृश्य हात असा उल्लेख करून आभार मानले काय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

मी गद्दारी करणार नाही : लंके
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंब यांच्याशी गद्दारी कदापि होणार नाही. पवार कुटूंबियांना दुःख होईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही. कोणी कितीही अफवा पसरवा, जनता त्यांच्या अफवांना बळी पडणार नाही, असा खुलासा आ. लंके यांनी केला आहे. रविवारी त्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीबद्दल शंका व्यक्त केल्याने त्यांनी त्यांची बाजू मांडली. स्वार्थासाठी बाप बदलणारा मी नाही. विधिमंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मी गैरहजर होतो, कारण मी आजारी होतो, पण माझ्या गैरहजेरीचे भांडवल करीत जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहे. त्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे सांगून ते म्हणाले, माझ्या पांढर्‍या पेशी कमी झाल्या आहेत. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे. याबाबत पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी बोललो होतो. त्यांनी माझ्या डॉक्टरांशीही चर्चा केली. आजारपणात प्रवास करण्याजोगी स्थिती नव्हती, सलाईन सुरू होते. जर बरे वाटले तर या, असा सल्ला पाटील यांनी दिला होता. जाण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून गेलो नाही आणि निवडणूकही फार अटीतटीची नव्हती. त्यामुळे त्यांच्या परवानगीनेच अनुपस्थित होतो. जर पाटील म्हणाले असते की, तुला काहीही करून यावेच लागेल व निवडणूक अटीतटीची आहे तर आयसीयूमधून उठून मतदानासाठी गेलो असतो, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. शरद पवार, अजित दादा पवार आणि सुप्रियाताई सुळे या त्रिमूर्तीपेक्षा मला मोठे काहीच नाही. माझा विठ्ठल बारामतीमधील शरद पवार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS