नांदेड : इंधन दरवाढ, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि किराणा साहित्याच्या महागाईने आता थेट विद्यार्थ्यांच्या ताटावरच घाला घातल्याचे चित्र नांदेड

नांदेड : इंधन दरवाढ, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि किराणा साहित्याच्या महागाईने आता थेट विद्यार्थ्यांच्या ताटावरच घाला घातल्याचे चित्र नांदेड शहरात दिसून येत आहे. एकेकाळी खिशाला परवडणारी समजली जाणारी राईसप्लेट, मेस आणि लहान हॉटेलांमधील जेवण आता विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी आणि अल्प पगारावर नोकरी करणार्या तरुणांसाठी आवाक्याबाहेर जात असल्याने शैक्षणिक वर्तुळात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
शिक्षणासाठी ग्रामीण भागातून नांदेडमध्ये येणार्या हजारो विद्यार्थ्यांचा आधार असलेली स्वस्त भोजन व्यवस्था आता डळमळीत झाली आहे. राईसप्लेटच्या दरात 10 ते 20 रुपयांची नव्हे, तर थेट 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी 40 रुपयांना मिळणारी राईसप्लेट आता 70 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचली असून, काही हॉटेलांमध्ये शंभरी गाठणारे दर विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहेत. महागाईच्या या वावटळीत सर्वाधिक होरपळ होत आहे. ती बाहेरगावी राहून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची आधीच वाढती फी, वसतिगृहाचा खर्च, अभ्यास साहित्य, प्रवास आणि दैनंदिन खर्चाचा डोंगर पेलताना अनेक विद्यार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आता दोन वेळच्या जेवणासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने अनेकांनी हॉटेलमधील जेवण कमी करून उपाशीपोटी अभ्यास करण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेली मोठी वाढ ही या परिस्थितीमागील प्रमुख कारण मानली जात आहे. याशिवाय तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मसाले, भाज्या आणि इतर किराणा साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे हॉटेल व्यवसायिकांनाही दरवाढीचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दरवाढीचा सर्वाधिक फटका शेवटी सामान्य ग्राहक आणि विद्यार्थ्यांनाच बसत आहे. शहरातील अनेक महाविद्यालयांच्या परिसरात आणि कोचिंग क्लासेसच्या भागात विद्यार्थी आता एकवेळचे जेवण टाळणे, मित्रांसोबत खर्च वाटून घेणे किंवा केवळ नाश्त्यावर दिवस काढण्यासारखे पर्याय स्वीकारत असल्याचे वास्तव समोर येत आहे. ही बाब केवळ आर्थिक नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित असल्यामुळे ती अधिक गंभीर ठरत आहे.
शिक्षणासाठी घरापासून दूर राहणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही चिंता वाढली आहे. आधीच शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी कर्ज, शेतीवरील अवलंबित्व किंवा मजुरी करणार्या कुटुंबांना दर महिन्याला वाढीव खर्च पाठवणे जड जात आहे. अनेक पालक मुलांच्या शिक्षणासाठी कंबर कसत असताना महागाईचे हे चटके त्यांना अस्वस्थ करत आहेत. शिक्षणनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी विविध जिल्ह्यांतून येतात. अशा परिस्थितीत स्वस्त आणि पौष्टिक अन्न उपलब्ध होणे ही केवळ बाजारव्यवस्थेची बाब नसून सामाजिक जबाबदारी आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजाच धोक्यात येत असतील, तर हा इशारा केवळ आर्थिक नाही, तर शैक्षणिक व्यवस्थेसाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे.
अभ्यासासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी झुंज द्यावी की वाढत्या महागाईशी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणार्या तरुणांच्या ताटातील घास महाग होत असताना त्यांच्या स्वप्नांवरही आर्थिक संकटाचे सावट दाटू लागले आहे.

COMMENTS