Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अलिबागच्या क्रूझ पार्टीत झाला त्याला इन्फ्लूएंझा व कोविड संसर्ग

तरुणाच्या मृत्यू कारणांचे विश्‍लेषण सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी ः मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका

महिलांना लेखन कलेत अनेक संधी- डॉ.ऋचा शर्मा
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी ः मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने मृत्यू झाला आहे. एन्फ्लूएंझा व कोविडचा संसर्ग होण्यापूर्वी संबंधित तरुण औरंगाबादहून मुंबईला आणि मुंबईतून अलिबागला क्रूझमधून गेल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. अलिबागची हीच क्रूझ पार्टी त्याला भोवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तरुणाच्या मृत्यूच्या कारणांचे विश्‍लेषण तज्ज्ञांद्वारे सुरू करण्यात आले आहे.

देशात इन्फ्लूएंझाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना महाराष्ट्रातील पहिला व देशातील तिसरा एन्फ्लूएंझाचा बळी नगरमध्ये गेल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली असून बुधवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील सूचना व उपाययोजनांची दिशा ठरवली आहे.

देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रातील हा पहिला तर देशातील तिसरा बळी नगरमध्ये गेला आहे. मंगळवारी (14 मार्च) दुपारी मृत युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली. दुसरीकडे मृत तरुणाचा कोविडचा अहवालही पॉझिटीव्ह होता. मृत तरुण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता. नगरमधील मोठया रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करताना त्याची प्रकृती गंभीर होती. मृत तरुण मूळचा औरंगाबादचा आहे. इन्फ्लूएंझाचा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुण्यामध्ये एचथ्रीएनटू या विषाणूमुळे बाधा झालेले 22 रुग्ण आढळल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

कोविड नियमांचा पालन करा – संबंधित तरुणाच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी सांगितले की, संबंधित तरुण हा 10 मार्चपूर्वी अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. त्यानंतर 11 तारखेला त्याला ताप आला. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने नकार दिला. त्याच मध्यरात्री त्याला खूप त्रास झाला म्हणून त्याला नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर दीड दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या संपर्कात 66 व्यक्ती होत्या. त्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सहाजण पॉझिटिव्ह होते. मात्र, त्यांना कसलाही त्रास नव्हता. उर्वरित दोघांना किरकोळ त्रास होता. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या पार्श्‍वभूमीवर, नगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून मास्क वापरावा व यासंदर्भात काही मदत लागल्यास जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. घोगरे यांनी केले आहे.

लगेच औषधोपचार घ्या ः सालीमठ – कोवीड व इन्फ्लूएंझा आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. ते म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा 13 मार्च 2023 रोजी रात्री 12 च्या सुमारास अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च 2023 रोजी खासगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व एच3एन2 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन न जाता कोवीड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.

कोवीड व इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, 5 वर्षाखालील बालके, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे. या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने नियमित हात धुवावेत. नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमालचा वापर करावा. डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे. पौष्टीक आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. फळे व हिरव्या पाले भाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन करताना, कोवीड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी हस्तांदोलन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे या बाबी कटाक्षाने टाळाव्यात. ज्या व्यक्तींचे कोवीड लसीकरण झालेले नाही, त्यांनी आपले लसीकरण करुन घ्यावे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत औषधोपचाराकरीता जावे असे आवाहनही सालीमठ यांनी केले आहे.

COMMENTS