केज : केज-बीड राज्य महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलसमोर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोराची धड

केज : केज-बीड राज्य महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलसमोर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५:४५ ते ६:०० वाजेच्या दरम्यान पुण्याहून केजच्या दिशेने येत असलेली आकाश ट्रॅव्हल्स (क्र. MH-08 AP 8555) ही शारदा इंग्लिश स्कूलजवळ आली असता, मांजरसुंब्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. GJ-15 AX 8625) तिला पाठीमागून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचा मुख्य चालक झोपलेला असल्याने त्याचा क्लीनर गाडी चालवत होता. रस्त्यावरील गतिरोधक न दिसल्याने हा अपघात घडला. क्लीनरने ऐनवेळी कंटेनर ड्रायव्हर साईटने वळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातामुळे केज परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणि ‘एचपीएम’ (HPM) कंपनीच्या गलथान कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपनीने शहरात व महामार्गावर बसवलेल्या गतिरोधकांवर (स्पीड ब्रेकर) कोणतेही पांढरे किंवा पिवळे पट्टे मारलेले नाहीत, तसेच परिसरात कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना हे गतिरोधक वेळेत दिसत नसल्याने येथे सातत्याने अपघात होत आहेत. हे गतिरोधक आता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असून, बेजबाबदार एचपीएम कंपनीवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवावी, अशी तीव्र मागणी प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS