Homeताज्या बातम्यासंपादकीय

देश सुरक्षा आणि हनी ट्रॅप

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या आंबटशौकीन अधिकारी आणि कर्मचार्‍याला जाळ्यात ओढणे, त्यांच्यासोबत फ्लर्ट करणे, त्यांच्यासोबत चॅट करतांना उघडे-न

तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष
सीमावादाला कर्नाटकी फोडणी
सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या आंबटशौकीन अधिकारी आणि कर्मचार्‍याला जाळ्यात ओढणे, त्यांच्यासोबत फ्लर्ट करणे, त्यांच्यासोबत चॅट करतांना उघडे-नागडे फोटो पाठवणे आणि त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रकार अनेकवेळेस झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता, भारतासारख्या विशाल देशामध्ये  सुरक्षेसंबंधित असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर बंधने घालण्याची गरज आहे. सुमारे दहा महिन्यापूर्वी दहशतवाद विरोधी पथकाकडून देशातील प्रमुख संशोधन संस्था असलेल्या डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंंंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडोच्या प्रदीप मोरेश्‍वर कुरुलकर शास्त्रज्ञाला अटक केली होती. या शास्त्रज्ञाने पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह अर्थात पीआयओच्या हस्तकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील शासकीय गुपिते पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. वास्तविक पाहता कुरूलकर ज्या हनीट्रॅपच्या जाळयात अडकला होता, तसाच प्रकार मुंबईतील माझगाव गोदीमध्ये घडला आहे. माझगाव गोदीतील आरोपी कल्पेश बैकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेशी चॅटिंग करत त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी एटीएसने त्याला अटक केली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर विभागाला पुरवल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाची सुरक्षा आणि हनीटॅ्रपला रोखायचे कसे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. दहशतवाद्यांचे सेल आणि त्यांच्या संबंधित संघटना अशा आंबटशौकीन अधिकार्‍यांना हेरतात, त्यांना लालूच दाखवली जाते, आणि त्यानंतर त्यांच्याकडून माहिती काढली जाते. शिवाय पुन्हा नवी माहिती मिळवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल देखील केले जाते. त्यामुळे प्रतिष्ठा आणि देशद्रोही म्हणून आपली ओळख उघड होईल या भीतीपोटी अधिकारी कर्मचारी गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्वाच्या पदावर नियुक्ती करणार्‍या अधिकार्‍यांची कठोर प्रशिक्षण देऊन त्याला मानसिकदृष्टया कणखर बनवण्याची गरज आहे. तरच देशाची सुरक्षा आणि गोपनीयता याबाबत सावधगिरी बाळगता येऊ शकते. अन्यथा हनीट्रॅपसारखे प्रकार सातत्याने घडतच राहतील. माझगाव गोदीतील आरोपी कल्पेश बैकर अनेक महिन्यांपासून समाज माध्यमावर एका महिलेशी चॅटिंग करीत होता. महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. कल्पेश बैकर याला हनी ट्रॅपद्वारे अडकवण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी एटीएसने कल्पेश व संपर्कात असलेल्या इतरांविरूद्ध शासकीय गुपीत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र हनीट्रॅप हा प्रथमच उघडकीस आला अशातला प्रकार नाही. तर तो अनेकवेळेस उघड झाला असून, त्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी यापूर्वी अडकले आहेत. बैकर याची 2021 ते 2023 या कालावधीमध्ये फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर विभागाशी संबंधित एका महिलेशी ओळख झाल्याचे उघड झाले होते. तपासणीत त्याने त्याने फेसबुक मेसेंजर व व्हॉट्स अ‍ॅपद्वारे प्रतिबंधक क्षेत्रातील गोपनीय माहिती महिलेला पुरवल्याचे निष्पन्न झाले. बैकरने युद्धनौका व पाणबुड्यांच्या संरचनांचे आरेखन पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 2020 पासून तेथे कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. यापूर्वी त्याच्या कंत्राटाचे तीन वेळा नूतनीकरण झाले आहे. आरोपीने महिलेच्या संपर्कात असताना माझगाव गोदीत आलेल्या युद्धनौका व पाणबुड्यांच्या रचनांची माहिती देणारे आरेखन आरोपीने महिलेला पुरवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करीत आहे. त्यामुळे हनीट्रप आणि देशाची सुरक्षा हा गंभीर विषय उभा राहतांना दिसून येत आहे. हनी ट्रॅपिंग ही गुप्तचर संस्थांद्वारे वापरण्यात येणारी एक पद्धत असून, यात धोकदायक बाब म्हणजे ही प्रकरणे शारीरिक संपर्काऐवजी सायबर स्पेसमध्ये घडतात. यापूर्वी कुरूलकर याला अशाच पद्धतीने अटक करण्यात आली होती. एखाद्या देशाकडून गोपनीय माहिती काढण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो, आणि आंबटशौकीन अधिकारी कर्मचारी त्या जाळ्यात सहज सापडतात. लैगिंक आकर्षणाच्या भावनेने त्यात ओढले जाते, आणि माहिती काढल्यानंतर ब्लॅकमेल करून, माहिती उघड करण्याचा इशारा देत गोपनीय माहिती मिळवली जाते.

COMMENTS