अहमदनगर/प्रतिनिधी ः दगड, माती, तळ्यातील गाळ हे निसर्गातील घटक स्वत:च्या निर्मितीसह हवामानाची व वातावरणाची माहिती देतात, परंतु त्याच्या जोडीने दगड
अहमदनगर/प्रतिनिधी ः दगड, माती, तळ्यातील गाळ हे निसर्गातील घटक स्वत:च्या निर्मितीसह हवामानाची व वातावरणाची माहिती देतात, परंतु त्याच्या जोडीने दगडावर उमटलेले पानांचे ठसेसुद्धा अशी माहिती देतात, असा दावा भवताल या पर्यावरण संवर्धन विषयक संस्थेचे संस्थापक अभिजीत घोरपडे यांनी केला आहे. यासंदर्भात भवतालतर्फे छोटा अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यामुळे आता कोरड्या असलेल्या प्रदेशात गेल्या काही हजार वर्षांमध्ये कशा प्रकारच्या वनस्पती होत्या आणि कसले हवामान होते यावर प्रकाश पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भवताल संस्थेतर्फे वंडर्स ऑफ जिऑलॉजी या इको टूरच्या माध्यमातून भूविज्ञानाच्या भूमिकेतून विविध परिसरांचा अभ्यास केला जातो. नगर जिल्ह्यातील पारनेर हा अतिशय कमी पावसाचा कोरडा तालुका असून तेथील वडगाव दर्या (कान्हूर पठार) या ठिकाणी काळ्या खडकापासून (बेसॉल्ट) काही चुनखडीचे खडक तयार झाले आहेत. ही निर्मिती काही शे वा काही हजार वर्षांची किंवा त्यापेक्षाही जुनी आहे. या खडकावर त्या भागातील वनस्पतींची पाने पडली की त्यावर अनेकदा या पानांचे ठसे उमटतात. तसे ठसे उमटलेले खडक भवताल संस्थेच्या इको टूरमध्ये मिळाले आहेत. ते कोणत्या वनस्पतींचे आहेत, याची ओळख पटवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तज्ञांची मदत घेण्यात येत आहे. त्यावरून, तिथे ज्या काळात हा चुनखडीचा खडक तयार झाला, त्या काळी कशा प्रकारच्या वनस्पती होत्या हे शोधणे शक्य होईल. या शोधातून कोणत्या वनस्पती होत्या हे समजून त्या काळातील हवामानावरही प्रकाश पडेल, असेही घोरपडे यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामध्ये इको टूरच्या माध्यमातून सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतील. विज्ञान आणि पर्यावरणाचा प्रयोगशाळेत अभ्यास होतोच, पण प्रत्यक्ष जमिनीवर/फिल्डवरही ते खर्या अर्थाने विकसित होत असते, असे घोरपडे यांनी सांगितले. भवतालच्या या प्रयत्नात सहभागी व्हायचे असेल तर अमित काळे (9422224884) व वनिता (9922063621) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS