Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोथीवाद आपल्या देशासमोरील मोठं आव्हान : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड / प्रतिनिधी : समाजाने वैज्ञानिक, मानवतावाद दृष्टिकोन स्वीकारणे हे 42 व्या घटना दुरुस्तीत सांगितले आहे. परंतू जेव्हा अंधश्रध्दा निर्मूलन हा

कालिकाईसह संपर्क अ‍ॅग्रोच्या कोट्यवधी फसवणूकप्रकरणी तीन संचालकांना अटक; सातारा अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
सह्याद्री खरेदी-विक्री संघ खत कारखाना उभारणार : सत्यजित देशमुख
वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार

कराड / प्रतिनिधी : समाजाने वैज्ञानिक, मानवतावाद दृष्टिकोन स्वीकारणे हे 42 व्या घटना दुरुस्तीत सांगितले आहे. परंतू जेव्हा अंधश्रध्दा निर्मूलन हा विषय कायदा म्हणून समोर आला. तेंव्हा मात्र काही लोकांनी याला कडाडून विरोध केला. हा कायदा हिंदू धर्मविरोधी असल्याचा कांगावा केला गेला. परंतू डॉ. नरेंद्र दाभोळकर सातत्याने कायद्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. शेवटी डिसेंबर 2013 मध्ये हा कायदा आम्ही मंजूर करून घेण्यात यश मिळवले. ज्या मनोवृत्तीने गांधींचा खून केला त्याच मनोवृत्तीने दाभोळकरांचा खून केला. दाभोळकरांना मारले परंतू त्यांच्या विचारांना मारता येत नाही ते आजही जिवंत आहेत. खरंतर या 21 व्या शतकात वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे आहे. परंतू दुर्दैवाने पोथीवाद हे आपल्या देशासमोरील एक मोठे आव्हान आहे, असे परखड प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तिकांचा लोकार्पण सोहळा प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अंनिस कराड शाखेचे समन्वयक बाळ देवधर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड उपस्थितीत होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कायदा झाला असला तरी आजही समाजात अघोरी घटना घडताना दिसत आहेत. बर्‍याच वेळेस गुन्हे लपवले जातात. हे दुर्दैव आहे. काही प्रसंगात गुन्हा सिध्द करणे अवघड जात आहे. त्यासाठी अजूनही नियमांमध्ये सुस्पष्टता आली पाहिजे याकरिता विद्यमान शासनाचा यामध्ये उत्साहाने पाठिंबा असणे गरजेचे आहे. यथायोग्य नियम शासनाने जाहीर केले पाहिजेत. तरच या गोष्टींना आळा बसू शकेल अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ही चळवळ पुढे नेत आहेत. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने हे विवेकी विचार अधिकाधीक लोकांपर्यंत जातील. चळवळ वाढेल, जनता या थोतांडापासून पासून बाजूला जाईल हीच अपेक्षा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. दाभोळकरांनी उभे आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनासाठी वेचले. अंधश्रध्देला, भोंदूगिरीला संपवण्याचा ध्यास घेतलेले डॉ. दाभोळकर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार ते हजारो कार्यकर्त्यांच्या मनात तेवत ठेवून गेले. खरे तर त्यांच्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचाही खून होणे म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा खून मानावे लागेल. या विवेकी विचारांना संपवण्याची दहशत जरी माजवली गेली असली तरी तेवढ्याच नेटाने ही चळवळ पुढे नेण्याचे काम अंनिसचे कार्यकर्ते करत आहेत. आपणही सर्वांनी 20 ऑगस्ट हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून विचारातून, कृतीतून साजरा करू हीच खरी डॉक्टरांना श्रध्दांजली ठरेल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंनिसचे कराड शाखा समन्वयक बाळ देवधर म्हणाले अंधश्रध्दा आणि जादूटोणाविरोधी कायद्याने नक्कीच काही अंशी अंधश्रध्दा बुवाबाजीवर वचक बसला आहे. पण असे असले तरी मागील 10 वर्षात 1000 पेक्षा जास्त गुन्हे याबाबत दाखल झाले आहेत. संपूर्ण जनमानसाने डॉक्टरांचे विवेकी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. याबाबत जनतेनेही आम्हाला चळवळ वाढीसाठी साथ देणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. हरी नरके यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तद्नंतर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमास वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सुधीर कुंभार, माजी नगरसेवक अशोक पाटील, इंद्रजीत चव्हाण, बाळासाहेब मोहिते, विजय दिवस समारोह समितीचे विलासराव जाधव, प्रा. भगवानराव खोत यांच्यासह कराड नगरीतील बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी केले तर आभार प्रा. सुभाष कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुरेश रजपूत यांचे सहीत सर्व प्राध्यापक व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

COMMENTS