कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे…;तहसीलदार देवरेंची ऑडिओ क्लिप राज्यभरात चर्चेत, हुंदके देत केलेल्या निवेदनाने समाजमन अस्वस्थ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे…;तहसीलदार देवरेंची ऑडिओ क्लिप राज्यभरात चर्चेत, हुंदके देत केलेल्या निवेदनाने समाजमन अस्वस्थ

अहमदनगर/प्रतिनिधी- कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे… माझ्यासारखी एक महिला अधिकार

बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी- कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे… माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरुष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकार्‍यांना घाबरून वागतील… किंवा इतर महिला अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील… अशा हुंदके देत व्यक्त होत असलेल्या भावना शुक्रवारी राज्यात खळबळ उडवून गेल्या. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा दिलेला इशारा व तो देत असताना हुंदके देत कथन केलेला छळ ऐकून समाजमन मात्र अस्वस्थ झाले आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेरला तहसीलदार म्हणून ज्योती देवरे काम करतात. त्यांनी शुक्रवारी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरिष्ठ महिला अधिकार्‍याची ही सुसाइड ऑडिओ नोट राज्यभर चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते झुंडीने धावून येतात; मदतीऐवजी वरिष्ठ मारेकरीच पोहोचवितात. लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले, असे हृदयाला बोचणारे शल्य या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी व्यक्त केल्याने प्रशासनात काम करणार्‍या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकार्‍याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारही हादरले आहे. तर विरोधी पक्ष भाजपने व मनसेने राज्य सरकारच्या कारभारावर यानिमित्ताने निशाणा साधला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यानिमित्ताने झडू लागल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने ही ऑडिओ क्लिप करणार्‍या देवरे यांना शुक्रवारी प्रत्यक्ष कोणी भेटले नसल्याचे समजते.

काय आहे या क्लिपमध्ये
तहसीलदार देवरे यांनी मनातील वेदना या ऑडिओ क्लिपमध्ये मांडल्या आहेत. यात त्यांनी, आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याचे म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील त्या वरिष्ठ महिला अधिकारी असल्याचे व त्यांनी त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. देवरे यांनी वन अधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून ही ऑडिओ क्लीप केली आहे. महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. मध्येच त्या हुंदके देत रडतानाही ऐकू येते. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण आपल्याला असल्याचे सांगत आहे.

दीपाली.. तुझ्या पाठी यावं वाटतंय
या क्लिपमध्ये त्यांनी म्हटले आहे, ’दीपाली, तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? भ्रष्टाचारी, दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

ओ..शेठ…पण, महिलांना कधी?
पुढे म्हटले आहे की, स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्‍न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही. कारण, अहिलेलासुद्धा माफी नव्हती. दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतुक होईल. मला म्हणतील, ओ शेट.. तुम्ही नादच केला थेट… अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरुषाला म्हणतात. बायांना कुठे शेठ म्हणता येते?, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे, ’हे पहा, पोथ्या वाचून तुझे नाव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही. त्यातून मला जिद्द मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते, सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की, अरे, ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडेसारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरुष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकार्‍यांना घाबरून वागतील. किंवा इतर महिला अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील, असे हुंदके देत त्यांनी म्हटले आहे.

अधिकारी स्तरावर हालचाली सुरू?
तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी मध्यस्थी करीत संबंधित महिला अधिकार्‍यांची भेट घेतल्याचे समजते. त्यांनी त्यांना समजावून सांगितल्याने त्यातून त्यांचे मनपरिवर्तन झाल्याचीही माहिती आहे. काही अघटीत होऊ नये यासाठी आता अधिकारी स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.

COMMENTS