दोन वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ब्रिटनच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित करणारे अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता शून्य आहे, असे निक्
दोन वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ब्रिटनच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित करणारे अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता शून्य आहे, असे निक्षून सांगितले होते. मुंबईच्या आयकर विभागाने मात्र मार्च २०२२ ला रिलायन्स समुहाचे अध्यक्ष म्हणून अनिल अंबानी यांच्याविरोधात आठशे कोटी रुपयांची अघोषित विदेशी संपत्ती बाळगल्याप्रकरणी ब्लॅक मनी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदविला होता. अनिल अंबानी यांचे हे प्रकरण एक प्रकारचे मनी लाॅन्ड्रींगच आहे. ब्रिटिश द्विपसमुहात अनिल अंबानी यांना थेट लाभ देणाऱ्या कंपन्यांचे जाळे असल्याचे आता उघड झाले आहे. सन २००६ मध्ये अनिल अंबानी यांनी बहामास येथे ड्रीमवर्क होल्डिंग्स इंक कंपनीबरोबर डायमंड ट्रस्ट ची स्थापना केली होती. आता याच कंपन्यांचे स्वीस बॅंक अकाऊंट असल्याचेही समोर आले आहे. पॅंडोरा पेपर्समध्ये देखील अनिल अंबानी यांच्या अठरा कंपन्यांचा सहभाग असल्याची माहिती लिक झाल्याचे हे तर जाहीरच आहे! २५ मार्च २०२२ ला सेबीच्या आदेशानंतर त्यांनी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर च्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२१ ला रिझर्व्ह बँकेने त्यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीला डिफॉल्टर घोषित करून तिच्या लिलावाची प्रक्रिया देखील झाली होती. एकंदरीत, चहुबाजूंनी अनिल अंबानी यांनी सार्वजनिक बॅंकांतून कर्जाची लूट करून ते जाणीवपूर्वक बुडविले आहे. जागतिक पातळीवर नाव असणारा एखादा उद्योजक विदेशातील न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित करतो; परंतु, प्रत्यक्षात त्या व्यक्तिकडे कोट्यवधी रूपयांचा मलिदा आहे. रिलायन्स कॅपिटल या कंपनीशी जवळपास इतर आठ कंपन्या त्यांचे रिलेटेड होत्या. अशा या जागतिक अर्थकारणात महत्त्वपूर्ण ठरलल्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन खोटे बोलणे, स्वतःला दिवाळखोर घोषित करणे, हे खरे तर आपल्या देशाची मान उंचावणारे कृत्य नक्कीच नाही. याच व्यक्तीकडे भारतातील सर्वात मोठा मिग फायटर विमान बनवणारा कारखाना नाशिकच्या ओझर येथे स्थित एच ए एल लिमिटेड म्हणून त्याची जगात ख्याती असतानाही अशा सार्वजनिक उद्योगाला लढाऊ विमाने तयार करण्याचे कंत्राट थेट केंद्र शासनाने हस्तक्षेप करून, याच व्यक्तीला फ्रान्सकडून तो करार मिळवून दिला. याचा अर्थ जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या पारदर्शी नाही, ज्या व्यक्तीचा कंपन्या बुडविण्याचा आणि बुडण्याचा इतिहास आहे, ज्या व्यक्तीची औद्योगिक कल्पकता शून्यवत आहे आणि बँकेतून घेतलेली कर्ज बुडविण्यासाठी जी व्यक्ती स्वतःला दिवाळखोर घोषित करते अशा व्यक्तीला सार्वजनिक संरक्षण साहित्य निर्माण करण्याचा कंत्राट मिळवून देणे, हे देशाच्या जनतेला निश्चितच भूषणावह नाही. सन २००६ मध्ये अनिल अंबानी हे त्यांच्या भावापेक्षाही श्रीमंत होते परंतु त्यानंतर ते सातत्याने मागे पडत गेले. संपत्ती असूनही उद्योजकाची कल्पकता आणि मानसिकता विकसित न झाल्यामुळे त्यांची उद्योग जगतातून पीछेहाट झाली. ब्रिटनच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात एका चीनमधील फायनान्स करणाऱ्या कंपनीने दाखल केलेल्या दाव्यात अनिल अंबानी यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते आणि आपली संपत्ती शून्य असल्याचे हे जाहीर केले होते; परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात ब्लॅक मनी ऍक्ट अर्थात बेहिशोबी मालमत्ता किंवा काळा पैसा बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया ही झाली. खरे तर भारतीय उद्योजक हे कल्पकतेच्या बाबतीत पिछाडीवर आहेत कारण भारतीय माणसाच्या गरजेनुसार कोणत्या वस्तूंचे आणि किती उत्पादन करावे यांचे अजूनही भारतीय उद्योजकांना ज्ञान नाही. यासंदर्भात टाटांचा नॅनो कारचा प्रकल्प जर सोडला, तर बाकी इतर बाबतीत ही कल्पकता शुन्य वाटते. भारतीय मध्यमवर्ग लक्षात घेऊन भारतीय उत्पादन केले जात नाही. त्याचप्रमाणे भारतातील गरीब वर्ग हा देखील निश्चित अशा बाजारपेठेचा ग्राहक असतानाही त्याचा उत्पादन ठरविण्यासाठी भारतीय उद्योजक विचार करित नाहीत! व्यापारी असणारे अनिल अंबानी जेव्हा उद्योगपती म्हणून झेप घेतात तेव्हा त्यांना जे अपयश आले, त्याचे मुख्य कारण हे व्यापारी म्हणून सामान्य कुवत असल्यामुळेच हा प्रकार घडतो आणि घडलाय!
COMMENTS