पी. चिदम्बरम हे नाव माहीत नसेल, असा भारतीय माणूस सापडणे कठीण आहे. देशाचे वित्त मंत्रालय दीर्घकाळ आणि गृह मंत्रालय अल्पकाळ सांभाळलेले पी. चिदम्बर
पी. चिदम्बरम हे नाव माहीत नसेल, असा भारतीय माणूस सापडणे कठीण आहे. देशाचे वित्त मंत्रालय दीर्घकाळ आणि गृह मंत्रालय अल्पकाळ सांभाळलेले पी. चिदम्बरम यांना वर्तमान संघ-भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तुरूंगात पाठविण्यासही मागेपुढे पाहिले नाही. तरीही, पी. चिदम्बरम यांनी काल देशातील काही अग्रणी दैनिकात लिहीलेल्या लेखामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी किंवा फडणवीस यांच्या हतबलतेचे समर्थन करण्यासाठी लेख लिहिला. केंद्रीय पातळीवर राजकारण करणारे चिदम्बरम हे काॅंग्रेसचे नेते असूनही त्यांनी भाजपचे प्रादेशिक राजकीय नेते असलेल्या फडणवीस यांची बाजू घेणारा लेख, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहीला. ज्या पक्षाने चिदम्बरम यांना तुरुंगात पाठवले त्याच पक्षाच्या एका प्रादेशिक नेत्याच्या समर्थनार्थ त्यांनी लेख लिहीणे हे आश्चर्यकारक आहे. मराठा समाजाचे जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आरक्षण आंदोलन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी “मी माझी जात बदलू शकत नाही’, असे वक्तव्य केले होते. फडणवीस यांचे हे वाक्य म्हणजे, जातीव्यवस्थेच्या बाहेर आलेल्या किंवा त्या व्यवस्थेतून वर आलेल्या माणसाचे लक्षण आहे. राजकारणात काही नेते जातीच्या घिरट्यात असतात; परंतु, काही नेते जातीय भावनेच्या वर येतात, असं चिदम्बरम म्हणतात. प्रादेशिक प्रश्नावर इतक्या तीव्रतेने त्यांनी लेख लिहीणे, ही खरेतर ब्राह्मण जात ही जाती कक्षेच्या बाहेर पडल्याचं प्रतिपादन करते. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडींना लक्षात घेऊन लिहीलेला हा लेख जातीव्यवस्थेवर ब्राह्मण समाज जातीच्या परिघाबाहेर पडला आहे, याची मांडणी करणारा आहे. खरेतर, मराठा जातीयवादाला लक्ष्य करून लिहीलेल्या या लेखाने “जात नाही ती जात” अशी अभौतिक आणि सनातन भूमिका मांडून एकाचवेळी जातीव्यवस्था नष्ट होणार नसल्याचे सांगून ब्राह्मण जात मात्र त्यातून बाहेर पडल्याचे अवास्तव निरीक्षण ते मांडतात. अर्थात, मराठा आरक्षणामागे त्यांचे जातीय आणि समाजाला अन्यायग्रस्त करण्याचे वास्तव आम्ही उद्याच्या दुसऱ्या भागात मांडणार आहेच; परंतु, चिदम्बरम ते फडणवीस हा धागा ज्या तत्परतेने आला, ते पाहता यातील कार्यकारण संबंध तपासण्याची गरज आहे. ज्या संघ-भाजप सरकारने चिदंबरम यांना तुरुंगात डांबण्यात जराही विचार केला नाही, ते चिदंबरम भाजप नेते असलेल्या फडणवीस यांच्या जातीय संरक्षणासाठी सरसावतात. यातून त्यांना हेच सुचवायचे आहे की, ब्राह्मण समाज जातीच्या कोषातून पूर्णपणे बाहेर आला आहे. याउलट ते उदाहरण देतात की, डॉ. आंबेडकर यांनी “ऍनिहिलेशन ऑफ कास्ट” या न दिलेल्या भाषणात त्यांनी जातीनिर्मूलनाचा विचार मांडला; यातून त्यांना जाती निर्मुलन किती कठीण आहे, हे त्यांच्या इतकं अधिक कोण जाणेल? या वर्णनात जातीव्यवस्था नष्ट होणार नाही, अशी धारणा ते मानतात. त्याऐवजी संघाकडून मांडली जाणारी समरसता चिदंबरम आपल्या लेखात मांडतात. चिदंबरम – फडणवीस यांचे हे सांस्कृतिक अघोषित ऐक्य असावे का? दुसऱ्या बाजूला मराठा समाज सत्तेत राहूनही आरक्षणाच्या मागणीपर्यंत जो आला आहे, त्यांचे ग्रामीण भागातील सामाजिक अत्याचार दुर्लक्षित करून सामाजिक मागास घोषित करण्याची आणि त्यायोगे आरक्षण मागण्याची त्यांची भूमिका ही केवळ सामाजिक हिंसाबळाने मान्य करायला पाहिजे हा अट्टाहास पोसायचा का? या दोन्ही संबंधांना घेऊन उद्याच्या दुसऱ्या भागात मांडणी होणार आहेच. परंतु, सामाजिक न्याय, सामाजिक अत्याचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू करण्याचा सध्याचा प्रयत्न समाजाच्या अग्रस्थानी आलाय का? या भूमिकांची गंभीर मांडणी आणि चिंतन याशिवाय पुढे जाता येणार नाही. इंग्रज हे विदेशी होते तरी सभ्य समाजाची रचना करण्यात ते डगमगले नाहीत. त्यामुळे, त्याकाळात अनेक सामाजिक सुधारणा करणारे कायदे त्यांनी अस्तित्वात आणले. ब्रिटिश कायद्यांनी आणलेल्या समाज सुधारणा, समाज परिवर्तनाच्या परिघाकडे नेणाऱ्या गोष्टी आपणांस समाज म्हणून कराव्या लागतील. अन्यथा, सामाजिक जुलूम करणारे आणि परिवर्तनाकडून अंधकारमयतेकडे नेणारे समाजावर कब्जा मिळवतील.
COMMENTS