विनयभंग प्रकरणात बोठेचा नवा जामीन अर्ज ; येत्या सोमवारी होणार सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंग प्रकरणात बोठेचा नवा जामीन अर्ज ; येत्या सोमवारी होणार सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा

विनयभंग करणार्‍या अधिकार्‍यांना येरेकरांचा आशीर्वाद ?
मशीराने धरला रमजानचा उपवास
सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच मजकूर टाकणार्‍यांवर होणार कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हाही दाखल असून, त्यात जामीन मिळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. येत्या सोमवारी (6 डिसेंबर) यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात फिर्यादीच्यावतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार असून, सोमवारी होणार्‍या सुनावणीच्यावेळी म्हणणे मांडण्यात येणार असल्याचे फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी सांगितले.

जरे यांच्या खुनाच्या घटनेनंतर एकीकडे पोलिस फरार असलेला आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा शोध घेत असताना त्याच्याविरुद्ध विवाहितेचा विनयभंग व खंडणी असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. जरे यांच्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासह या अन्य दोन गुन्ह्यांचेही तपास पोलिसांनी केले आहेत. या तिन्ही गुन्ह्यात आधी पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी बोठेला मिळाली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जरे खून प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज फेटाळला गेल्याने या निर्णयाला त्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. त्यावर येत्या 15 रोजी सुनावणी होणार आहे. याचवेळी त्याने त्याच्याविरुद्धचा खंडणीचा गुन्हा रद्द व्हावा म्हणूनही औरंगाबाद ख़ंडपीठात स्वतंत्र याचिका केली असून, त्याची सुनावणी प्रलंबित आहे. तसेच त्याने दुसरीकडे विनयभंग गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. मागील 29 नोव्हेंबरला दाखल झालेल्या या अर्जावर सुनावणी होऊन पोलिसांना म्हणणे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची शुक्रवारी (3 डिसेंबर) सुनावणी होती. पण पोलिसांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे यावरील सुनावणी आता सोमवारी (6 डिसेंबर) होणार आहे. या प्रकरणात फिर्यादीच्यावतीने हस्तक्षेप अर्ज करण्यात येणार असून, तो सोमवारच्या सुनावणीत दाखल करून त्याचवेळी फियार्दीचे म्हणणेही मांडले जाणार असल्याचे अ‍ॅड. पटेकर यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाच्या सोमवारी होणार्‍या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. मागील वर्षी 30 नोव्हेंबर 2020 रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे या आई, मुलगा व मैत्रिणीसह पुण्याहून नगरला येत असताना नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात (ता. पारनेर) त्यांची चार चाकी गाडी अडवून व चाकूने गळा कापून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केली होती व त्यांच्या चौकशीतून या खुनाचा सूत्रधार तत्कालीन दैनिक सकाळचा निवासी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला 102 दिवसांनंतर हैदराबादला अटक केली. तसेच त्याला फरार असतानाच्या काळात मदत करणार्‍या अन्य पाचजणांना मिळून या प्रकरणी 11जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बोठेने औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर येत्या 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणातही रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या सुनावणीच्यावेळी जरे यांच्यावतीने काय म्हणणे मांडले जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

COMMENTS