HomeUncategorized

पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला

पाचगणी / वार्ताहर : पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बा

नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द
हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे चैत्र यात्रेस प्रारंभ

पाचगणी / वार्ताहर : पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजारपेठेत काळा रंग अंगावर टाकून हल्ला केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पांचगणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. त्यानंतर आठवडा बाजारात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेते सर्वेक्षणाचे काम व बाजारातील स्वच्छता पाहणी करण्याचे कामासाठी मुख्याधिकार्‍या समवेत बांधकाम मुकादम सूर्यकांत कासुर्डे, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, लिपिक रवींद्र कांबळे व सागर बगाडे शिवाजी चौकात आले होते.
त्या ठिकाणाहून सर्वजण पथविक्रेते सर्वेक्षण तसेच बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत निघाले. ते महात्मा फुले हायस्कूलचे जुनी इमारतीचे गेट जवळ पोहोचले असता अनमोल अशोक कांबळे (रा. पाचगणी) हा सर्वांचे समोर येऊन मुख्याधिकार्‍यांना अडवून मला नोटीस का काढणार आहात, असे बोलून मुख्याधिकार्‍यांचा हात पकडुन धक्का देत खाली पाडून जखमी केले. त्याने त्याचे हातातील बाटलीमधील काळे द्रव्य अंगावर टाकला.
या घटनेने संतप्त झालेले पालिका कर्मचारी कार्यालयात जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यांनतर मुख्याधिकारी कर्मचार्‍यांसमवेत पोलीस ठाण्यात गेले. कर्मचार्‍यांनी नगरपालिकेचे काम बंद ठेवून सपोनि सतीश पवार यांना निवेदन देवून वारंवार कर्मचार्‍यांना काम करणे असुरक्षित झाले. तरी तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात अनमोल कांबळे याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पांचगणी पोलिसांचे पथक कांबळे याच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सपोनि सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाबळेश्‍वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांच्याबरोबर पांचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिकही पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेचा जाहीर निषेध करत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला.

COMMENTS