नांदेड: शहरातील आसना नदी पुलाजवळ घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या १५ दिवसांत पर्दाफाश करत दोन फरार आरोपींना जे

नांदेड: शहरातील आसना नदी पुलाजवळ घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या १५ दिवसांत पर्दाफाश करत दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या अचूक सापळ्यात दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या खूनप्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
११ जुलै २०२६ रोजी आसना नदीवरील पुलाखाली सचिन काळे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर हा घातपात (खून) असल्याचे स्पष्ट झाल्याने विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी आरोपींना तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने शोधमोहीम वेगाने सुरू ठेवली. अखेर रविवारी (२६ जुलै) सहायक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांच्या पथकाला फरार आरोपी शंकरराव चव्हाण चौक परिसरातील पुलाखाली येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने परिसराला वेढा घालून सापळा रचला आणि दोघांनाही पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल शंकर वाघमारे (वय २४, रा. माळजानगर, माळटेकडी, नांदेड) आणि प्रज्ज्वल उर्फ बारक्या उत्तम गोवंदे (वय २०, रा. त्रिरत्ननगर, सांगवी बुद्रुक, नांदेड) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत दोघांनीही सचिन काळे यांच्या खुनातील सहभागाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या खुनामागील नेमके कारण काय होते आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे, बळीराम दासरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS