Homeताज्या बातम्यासंपादकीय

अंबानी, अदानी आणि राजकारण

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यातील मतदान देखील पूर्ण झाले आहे. निवडणुकाचा मध्यावधी पार पडला असून आता निवडणुकीचे काही शेवटचे टप्पे पूर्णत्वास जाण्

लोकशाही मतदान आणि आपण
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख
वाढते अपघात चिंताजनक…

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यातील मतदान देखील पूर्ण झाले आहे. निवडणुकाचा मध्यावधी पार पडला असून आता निवडणुकीचे काही शेवटचे टप्पे पूर्णत्वास जाण्याचे बाकी असतांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होतांना दिसून येत आहे. विशेष काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी अंबानी आणि अदानी यांच्यावर थेट टीका केली होती. राहुल यांनी तर थेट लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी एका खासगी विमानाने एकत्र प्रवास करत असल्याचा फोटो लोकसभेत झळकावला होता, त्यानंतर लोकसभेतील गदारोळ सर्वश्रुत आहे. त्यानंतर देखील निवडणूक रोखे, भाजपला उद्योजकांकडून मिळणारा निधी अशा अनेक विषयांवरून राहुल गांधी यांनी भाजपला घेरले होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा विरोध करणारे किंवा त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचे टाळले होते. मात्र निवडणुका मध्यावधी असतांना पंतप्रधान मोदी यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर आरोप केला. निवडणुकापूर्वी अंबानी आणि अदानींवर टीका करणारे राहुल गांधी आता चुप्पी का साधली आहे, त्यांना त्यांच्याकडून लुटीचा माल मिळाला का ? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला. वास्तविक पाहता केंद्रातील भाजप सरकारने काँगे्रसची चहूबाजूंनी आर्थिक कोंडी केलेली आहे. काँगे्रसचे बँक खाते ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने सील केले होते.

अशावेळी काँगे्रसने आपल्याकडे कार्यालयाचे लाईटबील भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले होते. शिवाय काँगे्रसच्या एका उमेदवाराने पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी निधी न दिल्यामुळे निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे यातून काँगे्रसच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होते. तरी देखील काँगे्रसने आपल्या संघर्षाचा किल्ला न सोडता विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या मोदींना गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात कधीही अदानी आणि अंबानीविरोधात वक्तव्य करण्याची गरज पडली नाही, त्यांना आता ऐन निवडणुकीच्या मध्यावधी काळात असे वक्तव्य करण्याची गरज पडते, याचाच अर्थ भाजपचा आत्मविश्‍वास कमी पडतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता जनता कधीच कोणत्या एका पक्षाला जनसमर्थन देत नाही. जनतेला सुधारणा हव्या असतात, आणि सत्ताबदल झाला नाही तर, एकच वारंवार येणारे सरकार हुकूमशहाकडे वळते, आणि जनता आपल्याच मतदान करणार असा कयास हा सत्ताधारी वर्ग लावत असतो. मात्र जनतेला कधीही ग्रहित धरता येत नाही. त्यामुळे वारे कधी बदलेल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून महागाईत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जीएसटी हा मोदी सरकारच्या कार्यकाळात म्हणजे 2017 मध्ये सुरू झाला. जीएसटीच्या रूपात प्रचंड पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतांना दिसून येत आहे. या पैशांतून उद्योगपतींसाठी पायाभूत सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जात आहेत. मात्र सर्वसामान्यांसाठी कोणत्याही योजना राबवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. कल्याणकारी योजनांना प्रचंड प्रमाणात कात्री लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे विरोधी वातावरण दिसून लागल्यामुळेच राजकारणात आता अदानी आणि अंबानी येऊ लागल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होतील किंवा सहभागी होतील असे वक्तव्य करून राजकारणात चर्चांना उधाण आले असतांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काही वेगळे निकाल येतील अशी अपेक्षा नसली तरी, पारडे मात्र कुणाचे तरी जड होणार आहे, तर कुणाचे तरी हलके होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला फटका बसतो आणि कोणत्या पक्षाच्या जागा वाढतात, याचा निकाल 4 जून रोजीच होणार आहे. तोपर्यंत आगामी काही दिवसांमध्ये अंबानी आणि अदानींसोबत अनेक जणांचा उल्लेख होवू शकतो.

COMMENTS