वाढते अपघात चिंताजनक…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढते अपघात चिंताजनक…

देशभरात रस्ते वेगवान होतांना दिसून येत आहे. काही दिवसांचे अंतर काही तासांत पार करता येत आहे. दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत. मात्र याचबरोबर अपघ

सत्ताधारी आणि विरोधकांची ‘दिशा’  
काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?

देशभरात रस्ते वेगवान होतांना दिसून येत आहे. काही दिवसांचे अंतर काही तासांत पार करता येत आहे. दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत. मात्र याचबरोबर अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांचा अपघात झाला, त्याच दिवशी बीड-पाटोदा रस्त्यावर एका अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे काश्मीरमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद झाले. त्यामुळे दररोज होणार्‍या अपघातांमुळे मृत्यूची संख्या दररोज वाढतांना दिसून येत आहे. यावर गेल्या अनेक वर्षांपासून आपण उपाययोजना करत असलो तरी, अजूनही यावर उपाय निघू शकलेले नाहीत. मानवी चुका जरी या अपघाताला कारणीभूत असल्या, तरी या मानवी चुका आपण कमी करू शकलेलो नाही. देशात प्रतिवर्षी अपघातात दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातही मागील वर्षी म्हणजे 2021 साली जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70 टक्के लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. अपघाताची ही आकडेवारी चिंतीत करणारी आहे. बरं अपघाताचे प्रमाण केवळ एका राज्यात नाही, तर संपूर्ण देशभरात दररोज शेकडो अपघात होता. त्यात शेकडो जणांचा मृत्यू होतो, आणि हळहळ व्यक्त करुन, या अपघाताकडे दुर्लक्ष केल्या जाते. मानवी चुका कमी करण्यासाठी, अनेक कायदे करण्यात आले. मात्र कायदा करून त्यावर अंमलबजावणी होत नसेल, तर त्या कायद्याचा काय उपयोग? वाहनचालकांना कडक शिस्त लावणे गरजेचे आहे. कारण रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी आपले वाहन जबरदस्तीने पुढे नेण्याच्या प्रयत्नात नेहमीच छोटे अपघात होतच असतात. तर कधी रात्रीच्या वेळी ट्रक, तसेच मोठ-मोठे सामान वाहतूक करणार्‍या गाडया बेदरकारकपणे चालवल्या जातात. तर बर्‍याचवेळेस या चालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवतांना दिसून आले आहे. त्याचप्रकारे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, धोक्यांच्या फलकांची उणीव, रात्री रस्त्याच्या पट्ट्याच न दिसणे, प्रखर दिव्यांचा वापर अशी अनेक कारणे आहेत. रस्ते चांगले झाल्याचा परिणामही काही ठिकाणी अपघात वाढण्यात झाला आहे. धोकादायक वळणे कमी करण्याचा प्रयत्न रस्ते बांधकाम विभागाने केलेला नाही. त्यामुळेही अपघात वाढतात. रस्त्यांवर किती वेगाने वाहन चालविले पाहिजे, याची नियमावली असताना ती कुणीच पाळत नाही. अति घाई संकटात नेई, असा अनुभव पदोपदी येत असूनही त्यातून कुणी काही धडा घेत आहे, असे दिसत नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 2025 पर्यंत 50 टक्के घट होण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र आजची परिस्थिती पाहता, अपघाताचे प्रमाण आज जितके आहे, त्यापेक्षा अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येऊ शकते. कारण प्रत्येकाला जीव प्यारा असला तरी, एकदा की मनुष्य रस्त्यावर उतरला की, तो नियमांना धरुन चालतच नाही. नियमांना धरुन चालणारे, वागणारे थोडे, मोजके लोक अपवाद आहेत, मात्र ही संख्या कमी आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला कठोर उपाययोजना करावी लागणार आहे.

COMMENTS