Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा

चकलांबा : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, तब्बल अडीच वर्षे न्

सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर; लिंबागणेश येथे रास्ता रोको
दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात; कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीकडून निधी वितरण
स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे रोडवर जबरी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार पकडला

चकलांबा : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, तब्बल अडीच वर्षे न्याय न मिळाल्याने एका तरुणाने थेट जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील जे. जे. बागवान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 300 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव घेतला होता. यासाठी त्यांनी 2,15,040 रुपये तहसील कार्यालयात जमा केले. मात्र, त्यानंतर संबंधित प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही न झाल्याने त्यांची रक्कम अडकून पडली आहे. बागवान यांनी तहसीलदार संदीप खोमने, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी, उपविभागीय गौण खनिज अधिकारी किरण मोराळे, तसेच जिल्हा गौण खनिज विभागातील गजानन जाधव आणि महसूल सहाय्यक सुबोध जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अडीच वर्षांत केवळ टोलवाटोलवी करण्यात आली असून, बारकोडयुक्त पावती पुस्तकही देण्यात आलेले नाही. दरम्यान, सप्टेंबर 2024 मध्ये संबंधित वाळू साठा पुरात वाहून गेल्याचे प्रशासनाने मान्य केले असतानाही बागवान यांची रक्कम परत करण्यात आलेली नाही. उलट काही अधिकार्‍यांकडून उद्धट वर्तन झाल्याचा आणि पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असा अप्रत्यक्ष दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे बागवान मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. मानसिक व आर्थिक तणावामुळे त्यांनी 1 एप्रिल 2026 रोजी आत्महत्येचा इशारा दिला आहे. माझी रक्कम व्याजासह त्वरित परत मिळत नसल्याने आणि अधिकार्‍यांकडून होत असलेल्या छळामुळे मी जगण्याची इच्छा गमावली आहे. त्यामुळे मला आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या संभाव्य घटनेसाठी संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS