Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड

महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, याचे अनेक पुरावे गेल्या महिन्यांपासून समोर येतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज

शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
भाजपला बोध
इंडिया आघाडीची वाट बिकट

महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, याचे अनेक पुरावे गेल्या महिन्यांपासून समोर येतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटीचे मार्क वाढवून देण्यासाठी 50-50 हजारांची हजारो विद्यार्थ्यांना पैसे घेतल्याचे समोर आले होते. पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त यांनी या संपूर्ण प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढत अनेक बड्या अधिकार्‍यांना अटक करण्याचे धाडस दाखवले होते. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी, तसेच छोट्या-छोट्या कामांसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी लाच घेत असल्याचे नाशिक येथील एका महिला अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक केल्यानंतर समोर आले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात त्या दोषी आढळल्याने त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. शैलजा दराडे यांनी हे पैसै त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याच तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शैलजा दराडे यांना ताब्यात घेतले आहे. त्यातून शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार समोर येतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका तहसीलदाराला 15 लाखाची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. विशेेष म्हणजे शैलजा दराडे, किंवा तहसीलदार असो की, शिक्षण विभागातील इतर अधिकारी असो, हे चांगल्या पदावर कार्यरत असतांना, चांगला पगार आणि हुद्दा असतांना त्यांना अशी लाच घ्यावी लागते, किंबहुना तशी लाच घेण्याची त्यांची मानसिकता असते, यातच सर्व काही आले. विशेष राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व आयएएस, आयपीएस, उपजिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, तहसीलदार यांच्यासह सर्वंच विभागातील सरकारी नोकरदारांच्या संपत्तीची चौकशी केली, तर या अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करत आपल्या कार्यकाळात किती जमापुंजी गोळा केली आहे, याचे आकडे येतील. देशातील राजकारण्यांना आपण नावे ठेवतो, त्यांना राजकारणात एका निवडणुकीनंतर 5 वर्षांचा कार्यकाळ मिळतो. त्यांना प्रशासनाची इतकी जाण नसते, मात्र अधिकार्‍यांच्या जोरांवर हे राजकारणी मोठा भ्रष्टाचार करतात. सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत अशातला भाग नाही. काही अधिकारी प्रामाणिक आहेत. त्यांनी आपल्या तत्वांवरून अजूनही अजिबात विश्‍वास ढळू दिला नाही. सुनील केंदेेंकर, तुकाराम मुंढे यासारखे अनेक अधिकारी एका वर्षांत कितीही बदल्या झाल्या, तरी आपली तत्वे सोडत नाही. व्यवस्थेमध्ये काम करतांना अशा अधिकार्‍यांना त्रास होत नाही अशातला भाग नाही. मात्र व्यवस्थेचे बाहुले हे अधिकारी होत नाही. मात्र शैलेेा दराडे सारख्या अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार शिक्षण विभागातील कुणालाच माहीत नसेल अशातला भाग नाही. या विभागात त्यांचा कुणी गॉडफादर असल्याशिवाय त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणार नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील पाळेमुळे खोदण्याची गरज आहे. यामध्ये बडे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण क्षेत्र पवित्र असे क्षेत्र आहे. ते क्षेत्र आज पोखरले  जात आहे. त्यामुळे या क्षेत्राला वाळवी लागण्यापासून वाचवावे लागणार आहे. तरच भविष्यातील पुढील पिढी वाचेल, अन्यथा शिक्षणक्षेत्राच्या भ्रष्टाचारात या पिढीचे भविष्य बरबाद होईल. कारण शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी नैतिकता असावी लागते, ती जर नसेल तर भ्रष्टाचार होतो. त्यामुळे या संपूर्ण विभागाची झाडाझडती घेण्याची गरज आहे. 

COMMENTS