जत / प्रतिनिधी : जत पंचायत समिती येथे एका शिक्षकाची तीन महिन्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांनी 15 हजार रुपयेची लाच म
जत / प्रतिनिधी : जत पंचायत समिती येथे एका शिक्षकाची तीन महिन्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांनी 15 हजार रुपयेची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. 15 हजाराची लाच स्वीकारताना उपशिक्षक सनोळी यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी रतिलाल मर्याप्पा साळुंखे (वय 52) व मुचंडी कन्नड शाळेतील उपशिक्षक कांताप्पा दुडाप्पा सनोळी (वय 42) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील एका शिक्षकाला अर्जित रजेची गरज होती. ही रजा मंजूर करण्याकरीता गटशिक्षण अधिकारी यांचा निर्णय महत्त्वाचा होता. याकरीता संबंधित शिक्षकाला त्यांनी सनोळी या उपशिक्षकास भेटण्यासाठी सांगितले होते. ते भेटले असता तीन महिन्याची रजा मंजूर करण्यासाठी 60 हजार रुपयाची मागणी केली होती. चर्चाअंती अखेर 45 हजार देण्याचे ठरले होते. यानुसार शुक्रवारी दुपारी संबंधित शिक्षकाने पैसे दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचलेला होता. या सापळ्यात पैसे स्वीकारताना सनोळी सापडले. शुक्रवारी पडताळणीमध्ये 15 हजाराची लाच स्वीकारताना उपशिक्षक सनोळी यास अटक केले. ही लाच गटशिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे यांनी मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सिमा माने, धनंजय खाडे, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, राधिका माने स्वप्नील भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
COMMENTS