Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्ताकारणाचा केंद्रबिंदू माणूसच असावा ! 

भारत जोडो या ऐतिहासिक पदयात्रेनंतर राहुल गांधी यांनी 'भारत न्याय यात्रा', मणिपूर ते मुंबई, अशी सुरू करण्याचा मनोदय काल जाहीर केला. यापूर्वीची भार

महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 
नितीश कुमार यांची आक्रमक रणनीती ! 
एनडीए चे ‘मन’से !

भारत जोडो या ऐतिहासिक पदयात्रेनंतर राहुल गांधी यांनी ‘भारत न्याय यात्रा’, मणिपूर ते मुंबई, अशी सुरू करण्याचा मनोदय काल जाहीर केला. यापूर्वीची भारत जोडो पदयात्रा ही पूर्णपणे पायी होती. परंतु, भारत न्याय यात्रेमध्ये बस यात्रेचाही समावेश असेल आणि टप्प्याटप्प्यात पद यात्रेचाही समावेश असेल. या भारत न्याय यात्रेचा आज दखलमध्ये समावेश करण्याचे कारण असं की, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आता ऐरणीवर आल्या आहेत. देशाचा विरोधी पक्ष जवळपास संपुष्टात आणल्यासारखी परिस्थिती नुकत्याच संसदेत झालेल्या खासदारांच्या सामूहिक निलंबनातून दिसून येते. अशावेळी राजकीय पक्ष आणि येणारी-जाणारी राजकीय सत्ता, यांच्या मध्यवर्ती लोकशाही हा केंद्रबिंदू आहे! लोकशाहीचा केंद्रबिंदू अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्षांची मतभेदांची लढाई होत राहील. परंतु, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी सर्वंकष समाज घटकांमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या घटकांना निश्चितपणे भूमिका घ्यावी लागते. आज भारतीय लोकशाही तणावातून जात असल्याची भावना विरोधी पक्ष व्यक्त करतात. परंतु, त्यात वास्तव आहे की नाही, हा आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा नाही. आपल्या चर्चेचा मुद्दा २०२४ च्या निवडणुका ऐरणीवर असताना एका बाजूल अयोध्येतील राम मंदिर निर्माणचा आरंभ आणि तत्पूर्वी ‘भारत न्याय यात्रेचा’ आरंभ या दोघांमध्ये फक्त आठ दिवसाचे अंतर आहे. परंतु, या आठ दिवसाच्या अंतराचा भाग जो आहे, तो राष्ट्रीय समाजकारणाबरोबर राजकारणाचाही विषय होणार आहे. एका बाजूला धर्माच्या आधाराने राजकारणाकडे कुच करणारी विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला जनतेशी संवाद करून राजकारणाच्या दिशेने म्हणजे निवडणुकांच्या दिशेने जाणारी काँग्रेस या दोघांमध्ये भारतीय लोकांची मने नेमकी कोणत्या मुद्यांचा स्वीकार करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय प्रसार माध्यम ही वन साईड म्हणजे एकांगी झाली आहेत.  ही भूमिका पूर्वाश्रमीच्या याच माध्यमातून असणाऱ्या, सध्या बाहेर पडलेल्या अनेक व्यक्तींनी किंवा पत्रकारांनी व्यक्त करण्याची चढाओढ समाज माध्यमातून सध्या सुरू केली आहे. अशावेळी लोकशाहीची सूत्र, त्याची मूल्य आणि त्याचं मर्म हे अबाधित ठेवायचं असेल तर निश्चितपणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. राजकारणात धर्माचा हस्तक्षेप हा युरोपातील प्रबोधनाच्या संघर्षात त्याला समजून घेतला पाहिजे. राजकारण आणि धर्मकारण यांची फारकत घडवण्यात आली.  त्यानंतर राजकीय सत्तेला लोकांच्या कल्याणाच्या दिशेने मार्गक्रमण करावं लागलं. त्यातून आपल्याला युरोपची आजची विकसित अवस्था दिसते आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये देखील राजकारणावर धर्माची चढत असलेली पुटं जर अधिक मजबूत झाली तर राजकारणातील राजकीय पक्ष जेव्हा, राजकीय सत्तेत स्थानापन्न होतील तेव्हा, त्यांची बांधिलकी लोकांच्या कल्याणासाठी असण्यापेक्षा  धर्म श्रद्धेवर अधिक राहील. परिणामी लोककल्याण, विकास आणि आधुनिक समाज घडवण्याचं लक्ष या सगळ्यांपासून राजकीय सत्तेचे लक्ष विचलित होऊन लोकांना धर्मामध्ये गुंतवून त्यांच्या आस्थेच्या आधारे राज्य करण्याची मानसिकता बळावेल. ही मानसिकता लोकांच्या उत्थानाच्या किंवा लोककल्याणाच्या विरोधातील असते,  हे भारताच्या संविधान सभेने मान्य केलेलं तत्व आहे. त्यामुळे या तत्त्वाला अनुसरून २०२४ च्या अनुषंगाने निवडणुकांवर दृष्टि ठेवून राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका वठवणे योग्य ठरणार नाही.तर, देशातील लोकांचे कल्याण ज्यात दडलेले आहे, अशा सर्वंकष विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. १९७७ ला जयप्रकाश नारायण यांनी सर्वांकष क्रांतीची घोषणा केली होती. परंतु १९७७ ते २०२३ म्हणजे जवळपास ६६ वर्षाचा कालावधी आता गेला आहे. या ६६ वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सर्वंकष सोडा, पण ते सर्वंकष संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी आपल्याला साध्य करायची आहे, याचं साधं सोपं मार्गदर्शन देखील आज आपल्याजवळ उपलब्ध नाही. ही भारतीय समाजाची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. परंतु, एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आपण विचार करत असताना सर्वंकष क्रांती हा मुद्दा सोडून दिला तरी, माणसाच्या जीवनामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत बाबी फार महत्त्वाच्या आहेत. या तीन गोष्टी व्यक्तीच्या किंवा माणसाच्या जीवनात जर चांगल्या प्रकारे असतील, तर, तो माणूस आपला, पर्यायाने कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास घडवतो. व्यक्तीच्या विकासात समाजाचा विकास दडलेला आहे.  समाजाच्या विकासातच राष्ट्राचा किंवा देशाचा विकास दडलेला आहे. त्यामुळे विकास ही संकल्पना केवळ सांगून आणि लोकांच्या डोक्यावर आपटून ती सिद्ध होत नाही; तर, आपल्या सत्तेचा केंद्रबिंदू माणूस आणि त्या माणसाचं दुःख निर्मूलन करणे यातच सामावलेल आहे! माणसाला शिक्षण मिळालं नाही तर त्याच्या जीवनात अनेक प्रकारची दुःख येतात. माणसाला चांगलं आरोग्य मिळालं नाही तर जगण्याचं स्थैर्य आणि जगण्यातला विचार हरवून जातो. त्याच माणसाला जगण्यासाठी उदरनिर्वाहाच साधन नसेल म्हणजे रोजगार नसेल तर, तो माणूस कोणाचाही गुलाम होण्याचं अगदी सहजपणे स्वीकारू शकतो. त्यामुळे या व्यक्तीच्या जीवनातील तीन मूलभूत गोष्टींची जर त्यांना प्राप्ती झाली तर निश्चितपणे समाज जीवन हे विकसित होतं.  पर्यायाने ते राष्ट्र विकसित होतं. आज युरोपीय देशांकडे पाहत असताना आपल्याला हे प्रकर्षाने जाणवेल आणि म्हणून एका बाजूला भारत न्याय यात्रा आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिर आरंभ या दोन्ही गोष्टींच्या मधून भारतीय माणसांना आपला माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून उत्तराचा मार्ग चोखाळणे अधिक व्यवहार्य राहील. माणसाच्या अस्तित्वाशिवाय देव-धर्म संस्कृती आणि  समाजसंस्था या कोणाच्याही अस्तित्वाला आकार येत नाही; मूल्य राहत नाही. त्यामुळे माणूस हा प्रथम आहे आणि नंतर त्याच्या भोवतालचं विश्व आहे. भारतीय समाजाने, लोकांनी आपल्या मनोचिंतनात स्वतःच्या पर्यायाने कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाच्या म्हणजेच राष्ट्राच्या उत्थानासाठी विचार प्रवण होऊन, त्यांना या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा आणि वास्तव स्वीकारून त्याने देशाला समृद्ध करावं. देशाला महाशक्तीच्या दिशेने नेणे, हाच सामान्य माणसासाठी खरा विचार असू शकतो असू शकतो.!

COMMENTS