Homeताज्या बातम्यासंपादकीय

तर, जगात शांतता अशक्य…..! 

संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव अंतानियो गुटर्स यांना त्यांच्या पदावरून ताबडतोब राजीनामा देण्यास भाग पाडावे, असे थेट जाहीर आव्हान इजराइलचे संयु

जनताच सर्वोतोपरी ! 
पतंजली ला झटका!
धर्म सत्कर्माने व्यक्त व्हावा !

संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव अंतानियो गुटर्स यांना त्यांच्या पदावरून ताबडतोब राजीनामा देण्यास भाग पाडावे, असे थेट जाहीर आव्हान इजराइलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाड इर्दान यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव अंतानियो गुटर्स यांनी गाझापट्टीतील लहान मुलांच्या हिंसाचाराविषयी चिंता व्यक्त केली होती. या विरोधात प्रतिक्रिया देताना इर्दान यांनी  अंतानियो गुटर्स हे पदासाठी योग्य नसल्याचा अभिप्राय देऊन, त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी जाहीर मागणी केली. अर्थात, हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय गुंतागुंतीचा बनत चालला आहे. इजराइल आणि पॅलेस्टीन या लढ्यामध्ये इजराइलने ज्या पद्धतीने गाझापट्टीवर हल्ला चढवला, त्यातून त्यांनी हॉस्पिटल्स आणि लहान मुले यांचा देखील मुलाहिजा केला नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी चिंता व्यक्त करणे स्वाभाविक होतं. परंतु, नेमकी हीच गोष्ट इजराइलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत इर्दान  यांनी आक्षेपार्ह मानली आहे. तसे पाहिले तर, दुसऱ्या महायुद्धानंतर विनाश पाहिलेल्या जगाने, त्या पुढील काळात कायम शांतता नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केली. याच संस्थेमार्फत जगातील सर्व देशांचे समन्वय चर्चेच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय नितीनियमांच्या माध्यमातून साधले जाते. जगाने अण्वस्त्र संपन्न होत असतानाच, निशस्त्रीकरणाची प्रक्रिया देखील राबवली, ती देखील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्थीनेच! जगातील कोणत्याही दोन राष्ट्रांमधील किंवा दोन पेक्षा अधिक राष्ट्रातील निर्माण झालेल्या वादांवर चर्चेच्या माध्यमातून उपाय किंवा तडजोडी करण्याचे कार्य संयुक्त राष्ट्र संघाकडून केले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आणि विशेषतः कोरोना नंतरच्या काळात संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व  अमेरिकेसारख्या देशानेच कमी केले. त्यापूर्वीही अमेरिका संयुक्त राष्ट्र संघटनेला सर्वाधिक निधी देत असल्यामुळे ते अनेक निर्णयांमध्ये आपला हस्तक्षेप अप्रत्यक्षपणे करीत राहिले आहेत. तरीही युनोच्या नकाराधिकार असणाऱ्या परिषदेवर जे प्रमुख राष्ट्र आहेत, त्यांच्या माध्यमातून जगाचा समन्वय साधला जातो. आता कोरोना काळात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने जागतिक आरोग्य संघटनेबरोबर आपले संबंध तोडून घेतले; त्यावरून संयुक्त राष्ट्र संघटनेचे देखील यातून अप्रत्यक्षपणे त्यांनी महत्त्व कमी केले. जगातील दोन राष्ट्रांचा विवाद सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना हल्लीच्या काळात कामी येत नसल्याचे रशिया आणि युकेन या युद्धातून जसे दिसते, तसेच इजराइल आणि हमास यांच्या युद्धातूनही दिसून येत आहे. खरेतर, जगाला आता खऱ्या शांततेची गरज आहे कारण जगातील अधिक तर देश आता अण्वस्त्र संपन्न आहेत. अशावेळी जगभरातील वेगवेगळ्या विवादांवर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो, ही साधी गोष्टही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आता शक्य राहिलेली दिसत नाही! याउलट जागतिक भांडवलाच्या जोरावर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांचा राजीनामा मागण्याची भूमिका एखाद्या देशाच्या राजदूताने घ्यावी, ही संयुक्त राष्ट्र संघटनेला किती अवनत दर्जावर जगाने आणून ठेवले आहे, याचे ते निदर्शक आहे. अमेरिका – युरोप आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतील नकाराधिकार असणाऱ्या राष्ट्रांनी यावर खरे तर प्रमुख भूमिका निभावली पाहिजे. परंतु, या संदर्भात कोणतेही राष्ट्र गंभीरपणाने पुढे येण्यास तयार नाही. जर अशाच पद्धतीने संयुक्त राष्ट्र संघटनेला तळास नेण्याची प्रक्रिया विविध देशांचे राष्ट्र प्रमुखच करत असतील, तर यापुढील काळात जागतिक शांतता नांदण्याची हमी जगातली कोणतीही शक्ती देऊ शकणार नाही! युक्रेन – रशिया आणि इजराइल – पॅलेस्टीन यांच्या युद्धावर तात्काळ बंदी आणून जागतिक शांततेची बोलणी करण्यासाठी जगातील सर्व राष्ट्र प्रमुखांनी आघाडी घ्यावी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व पूर्वी इतकेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक असावे, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे अधिकार आणि एकूणच संस्था म्हणून संपुष्टात आली, तर जागतिक शांतता आणि समन्वय साधण्यासाठी जगातील कोणतीही शक्ती अस्तित्वात राहणार नाही, ही गंभीर बाब आता जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी लक्षात घेण्याची गरज आहे!

COMMENTS