राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह 30 आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार गटविरुद्ध
राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह 30 आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळेल असे वाटत होते. कारण अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. तसेच शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतलेली बैठक अवैध असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी देखील मी जर पुस्तक लिहिले तर, त्यातून अनेक गौप्यस्फोट होतील, असे स्पष्ट करत खुद्द शरद पवारांनाच इशारा दिला होता. मात्र त्यानंतर शरद पवारांनी येवला येथे सभा घेतल्यानंतर आणि त्यांन मिळणारा प्रतिसाद बघितल्यानंतर अजित पवार गट नरमल्याचे दिसून येत आहे. एकतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्यात असतांना, त्या पक्षावर दावा करणे अयोग्य आहे, त्याचबरोबर बहुमत असले म्हणजे पक्ष बळकावता येत नाही, त्यामुळे अजित पवारांसह इतरही आमदारांनी शरद पवारांची भेट घेत माफी मागीतली. मात्र अजित पवारासंह प्रफुल्ल पटेलांचे मत असे आहे की, बहुसंख्य आमदारांचे मत आहे, की आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावे, त्यामुळे या निर्णयाला तुम्ही पाठिंबा द्यावा, अशी या नेत्यांनी गळ घातली. मात्र शरद पवारांनी अजित पवार गटाचे मनसुबे उधळून लावत, मंगळवारी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावली. एकीकडे अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहत आहे. त्याचबरोबर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार या तिघांमध्येच काही वेळ चर्चा झाली. ही चर्चा गोपनीय असल्यामुळे त्याचा वृत्तांत माध्यमांमध्ये तूर्तास तरी येण्याची शक्यता नाही. मात्र या बैठकीपासून जयंत पाटील, रोहित पवार यांना सुद्धा बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे या बैठकीवर आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. काँगे्रसने देखील अशा गोपनीय बैठका महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतात, असे म्हटले आहे. खरंतर, शरद पवार महाविकास आघाडीचा एक घटक आहे, आणि ते सत्ताधारी पक्षासोबत गेलेल्या अजित पवार गटांसोबत गुफ्तगू करत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खरंतर, शरद पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाही. कारण शरद पवारांनी आपले संपूर्ण जीवन काँगे्रसी विचारांचे राजकारण करण्याला प्राधान्य दिले आहेत. त्यांनी अनेकवेळेस सत्ता स्थापन करण्यासाठी काही पक्षांची मदत घेतली असेल, किंवा बाहेरून पाठिंबा घेतला असेल, फोडाफोडीचे राजकारण केले असेल, अनेकांना कात्रजचा घाट दाखवला असेल, मात्र त्यांनी आपल्या काँगे्रसी विचारांसोबत कधी फारकत घेतली नाही. अशा परिस्थितीत जर शरद पवारांनी आपला आशीर्वाद अजित पवार गटाला दिला तर, शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता शेवटच्या टप्प्यात संपुष्टात येईल, त्यामुळे शरद पवार असा अविवेकी विचार करणार नाही. मात्र राजकारण हे नेहमीच शक्यता-शक्यतेवर आधारीत असते. त्यामुळे उद्या राजकारणात काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे उद्या जर, शरद पवारांनी पाठिंबा दिल्यास नवल नकोे. मात्र दोन्ही गटातील राजकीय संघर्ष जणूकाही संपल्यागत दिसून येत आहे. वास्तविक पाहता, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी दांडी मारणेच पसंद केले, त्यामुळे कोणत्या गटात किती आमदार आहेत, याचा अजूनही उलगडा होतांना दिसून येत नाही.
COMMENTS