Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागावाटपांची कोंडी फुटेना

देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली आणि इतर राज्यांमध्ये लोकसभेचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी, महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महाविका

जागावाटपाचा गुंता
राजकारणातील मूल्ये आणि नैतिकता
माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा

देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली आणि इतर राज्यांमध्ये लोकसभेचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी, महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची कोंडी अजूनही फुटण्याची चिन्हे नाहीत. कारण युती आणि आघाडीमध्ये काही जागांवरून तणाव असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि पवारांनी सवता सुभा उभा करत पक्ष आणि चिन्हच ताब्यात घेतला आहे. शिवाय त्याला निवडणूक आयोगाकडून अधिकृत मान्यता देखील मिळवली आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गट असे चार पक्ष या दोन पक्षातून उदयास येतांना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणाचा विचका झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच जागावाटपांचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपले विद्यमान खासदारांना तरी किमान जागा मिळाव्या अशी अपेक्षा आहेत, मात्र भाजपकडून सर्व्हेचा दावा करत अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापून त्या ठिकाणी नव्या चेहर्‍याला संधी देण्याची मागणी केली जात आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक खासदारांची तिकीटे कापली जावू शकतात, अशा वेळी बंडखोरी देखील होण्याची शक्यता वाढतांना दिसून येत आहे. भाजपने जळगावमधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी डावलत स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला असला तरी त्यांना, त्याठिकाणावरून ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर न करता, दुसर्‍याच उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जळगावमध्ये बर्‍याच राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. यासोबतच एकनाथराव खडसे यांनी सुनेविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. शिवाय खडसे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. शिवाय खडसे यांनी राजधानीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेठीगाठी घेतल्याचे समोर आले आहे. यासोबतच कोल्हापूरची जागा काँगे्रसला सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा करत आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र काँगे्रसने या जागेवरून मोठा संघर्ष उभा केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील आमदार विश्‍वजीत कदम यांनी देखील ही जागा ठाकरे गटाला देण्यास विरोध करत, आगामी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सातार्‍याच्या जागेवरून महायुतीमध्ये सोबतच महाविकास आघाडीमध्ये देखील पेच दिसून येत आहे. सातार्‍यामध्ये विद्यमान खासदार शरद पवार गटाचा असून, श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे काँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्‍यातून काँगे्रसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार ही जागा आपल्या पक्षाकडे असल्यामुळे सोडायला तयार नाही. यासोबतच दक्षिण मुंबईतील जागेचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. ही जागा मनसेने मागितली आहे. मनसेकडून बाळा नादंगावकर ही जागा लढण्यास इच्छूक आहेत, तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघेही ही जागा मिळवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 5-7 जागांवरून नाराजीनाट्य चांगलेच रंगतांना दिसून येत आहे. शिंदे आपल्या मुलासाठी लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी होतात की, या महाराजकारणात ते आपल्या मुलाच्या खासदारकीचा बळी देतात, ते आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहेत, मात्र निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतांना देखील अनेक जागावरील चित्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही, त्यामुळे जॅकपॉट नेमका कुणाला लागणार, याचा खुलासा काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे. 

COMMENTS