Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तींयांवर ‘ईडी’चे छापे

मुंबईत 16 ठिकाणी धाडी ः कोविड सेंटरप्रकरणी कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणीत वाढ होत असून, बुधवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मुंबई महापालिकेच्य

पंजाबमध्ये ईडीचे 13 ठिकाणी छापे
राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच छापे
ईडीची बंगाल, तामिळनाडूमध्ये छापेमारी

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणीत वाढ होत असून, बुधवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. विशेषकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.
कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुरज चव्हाण या आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या मदतीने कोरोना काळात कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेले होते असा आरोप केला होता. दरम्यान आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने छापेमारी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता या प्रकरणात सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या निवासस्थानी ईडीची धाड पडल्याची माहिती मिळत आहे. संजीव जैस्वाल हे मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त होते. ईडीची एकूण 16 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. कोविड कथित घोटाळा प्रकरणातील फाईल्स ज्यांच्यामार्फत हाताळल्या गेल्या अशा महानगरपालिकेचे अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. संजीव जैस्वाल हे आधी ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेचे आतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक मिळाली. त्यानंतर ज्या संदर्भात ईडी चौकशी करत आहे त्या कॉन्ट्रॅक्टमधील एक भाग संजीव जैस्वाल यांच्याकडे होता. त्यांच्या विभागाकडून ही फाईल हाताळली गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून नेमके काय घडले आणि कॉन्ट्रॅक्ट्स कसे आणि का ? देण्यात आले यासंबंधी ईडीकडून माहिती घेतली जात आहे. एकूण 16 ठिकाणी बुधवारी सकाळी 7 ते 8 दरम्यान ही छापेमारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या घरी चेंबूर, गोवंडी या ठिकाणी देखील छापे टाकण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. सुजीत पाटकर सोबतच इतर तात्कालीन मनपा अधिकारी तसेच आदित्य ठाकरे यांचे काही निकटवर्तीय यांच्या घरी छापेमारी केल्याचे बोलले जात आहे.

काय आहे कोविड सेंटर घोटाळा ? – मुंबई महापालिकेने ऑक्टोबर 2022 मध्ये सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला पाच कोविड सेंटर्सचे कंत्राट दिले होते. मात्र, मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्यावेळी ही कंपनीच अस्तित्वात नव्हती. तसेच, ती नोंदणीकृत फर्म नसल्याचाही आरोप आहे. या घोटाळ्यात 100 कोटी रुपयांचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले. कोरोनाच्या काळात वैद्यकीय आणीबाणीच्या नावाखाली खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई पालिका प्रशासनावर करण्यात येत आहे. याशिवाय, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेने एप्रिल 2020 मध्ये रेमडेसिव्हिरची एक कुपी 1568 रुपयांना विकत घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तर, सरकारी हॉफकिन संस्थेने तेच औषध 668 रुपयांनी विकत घेतले होते. या कालावधीत बीएमसीने 2 लाख कुपी खरेदीचे कंत्राट दिले होते. याचप्रकरणाची सध्या ईडी चौकशी करत आहे.

COMMENTS