Homeताज्या बातम्यासंपादकीय

नवनिर्माण न होणारे राजकीय अपयश ! 

कधीकाळी महाराष्ट्र हे राज्य स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारे काॅंग्रेस, कामगारांची चळवळ असलेले कम्युनिस्ट, सामाजिक समतेचे वातावरण ढवळून काढणारे

देणाऱ्याची झोळी दुबळी !
महाराष्ट्र ते अमेरिका : राज, अर्थ आणि सत्ताकारण!
समाजवादी आणि उध्दव ठाकरे !

कधीकाळी महाराष्ट्र हे राज्य स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारे काॅंग्रेस, कामगारांची चळवळ असलेले कम्युनिस्ट, सामाजिक समतेचे वातावरण ढवळून काढणारे आंबेडकरी चळवळ या तीन प्रमुख भागांमध्ये राजकीय दृष्ट्या विभागली असताना या तिघांचा टोकाचा वाद संमजसतेने( आव आणून ) आपल्याकडे खेचून आणणारी समाजवादी चळवळ अशा चार अंगाने विभागली गेली होती. त्यात चारही राजकीय विचार तसे पुरोगामीच! होते. हे वातावरण नव्वदी पर्यंत थोड्याफार फरकाने सातत्यपूर्ण होते. परंतु, नव्वदी नंतर देशातील राजकीय विचार हा पध्दतशीरपणे नव्या कलाटणीकडे झुकविण्याचे राजकारण गतिमान झाले. ही कलाटणी कशी आणि का दिली गेली हा लेखाचा एक स्वतंत्र भाग नंतर कधीतरी लिहू. परंतु, या कलाटणीने महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे काही आले त्यात अत्यंत अपयशी ठरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचाही समावेश करावा लागेल. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची चालण्या-बोलण्या-वागण्यापासून सर्व पध्दतीची नक्कल आत्मसात केलेले राज ठाकरे यांचे नेतृत्व हे मराठी माणसात कितपत यशस्वी झाले, असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्राला त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. याचे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या बोलण्याची नैसर्गिक जरब जशी महाराष्ट्राला नवी होती तशी राज ठाकरे यांचे बोलणे महाराष्ट्राला नवे नाही. कालच त्यांचा पाडवा मेळावा संपन्न झाला. दसरा मेळावा, पाडवा मेळावा या सगळ्या इव्हेंट वजा सभा एका विशिष्ट तंत्राने गर्दी आणून केले जातात. अर्थात, आज कोणत्याही पक्षाची सभा भव्य झाली तरी ती गर्दी उस्फूर्त नसते. गावाकडून महानगर एक दिवस पाहण्याच्या आणि सोबत प्रवास-भोजन आदिंची रस्त्याने व्यवस्था होणाऱ्या या काळात सभेला गर्दी असणं तस अप्रूप नाही. सर्वच पक्षांची सभामंडपे, मंच आदी सर्व सारखेच सजविले जातात, रंगाचा अपवाद सोडला तर. या सभा प्रत्यक्ष होण्यापूर्वीच सभा कशी गाजवली जाईल, नेते काय बोलतील याच्या चर्चा माध्यमातून पेरल्या जातात. प्रत्यक्षात सभा झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या बाबतीत जनतेचा मात्र भ्रमनिरास झालेला असतो. कारण, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडे महाराष्ट्राच्या नियोजनबद्ध विकासाचे ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे ,बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे, दिवसेंदिवस लोकांच्या हाताबाहेर जाणाऱ्या वैद्यकीय खर्चापोटी श्रमाच्या कमाईचा मोठा हिस्सा खर्च होण्याला लगाम लावण्याचा, सर्वांना गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी सार्वजनिक संस्था अधिक प्रमाणात उघडून शिक्षणातून प्रत्येकाचे जीवन समृद्ध करण्याचा कार्यक्रम ठोसपणे द्यावा किंवा दिला जावा, अशी जनतेला अपेक्षा असते. परंतु, सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते केवळ एकमेकांच्या विरोधकांवर टीका करणे, तरूणांच्या विधायकतेला चालणा देण्याऐवजी त्यांच्यातील हिंसकतेला चिथावणी देण्यात देण्यात धन्यता मानतात. परंतु, अशा कार्यशैलीला महाराष्ट्रातील तरूण आता वैतागला आहे. त्याला शांततापूर्ण समृध्दीच जीवन जगायचं आहे. त्यामुळे, तरूण नेतृत्वाकडून तरूणांच्या अपेक्षा होत्या. मात्र, तरूणांच्या या अपेक्षांची पूर्तता न करू शकणाऱ्या मनसे’ चे नेते मात्र, या वास्तवाला झुगारित पुन्हा नव्वदीच्या वातावरणाकडे तरूणांना घेऊन जाण्याची जी चूक करतात, त्यातच त्यांच्या पक्षाचे अपयश दडलेले आहे. माध्यमातून प्रसिध्दीच्या झोतात राहून पक्षबांधणी करता येत नाही, हे वास्तव जोपर्यंत गांभीर्याने लक्षात घेतले जाणार नाही, तोपर्यंत राजकीय यश हुलकावण्याच देत राहिल! त्यामुळे केवळ माझ्या हातात सत्ता द्या मग महाराष्ट्र सरळ करतो, असली विधाने भंपक आणि धमकीचीच वाटत राहतील! यातून लोकांची मते बनविण्याचे उद्दीष्ट कधीच साध्य होवू शकत नाही! 

COMMENTS