Homeताज्या बातम्यासंपादकीय

समाजवादी आणि उध्दव ठाकरे !

 समाजवादी चळवळीतील २१ घटक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीमध्ये एकत्र आल्याने, महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. मुळातच समाजवाद हा या देशातील

राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
ग्लोबल स्लेवरी : एक धक्कादायक वास्तव ! 
बॅलट उरले फक्त स्मृती पटलावर ! 

 समाजवादी चळवळीतील २१ घटक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीमध्ये एकत्र आल्याने, महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. मुळातच समाजवाद हा या देशातील राजकीय आणि सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मध्यममार्ग आहे, असे नेहमीच मानले जाते. पंडित नेहरू आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील स्वतःला समाजवादीच म्हटले होते. भारतीय संविधान हे आर्थिकदृष्ट्या देखील समाजवादी भाष्य करते. देशातील सार्वजनिक उद्योगांची एक साखळी भारतीय संविधान कायम ठेवायला सांगते आणि त्याबरोबर इतर छोटे आणि काही उद्योग यासाठी खाजगी क्षेत्रालाही वाव देते. हा मध्यममार्ग म्हणजेच संविधानाला अपेक्षित असणारा आणि सामाजिक आणि राजकीय चळवळीत अंमलात येणारा असा विचार आहे. हा विचार आता समाजवादी चळवळीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळला आहे, ही बाब आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. समाजवादी विचार हा नेहमीच संविधानाच्या बाजूने म्हणजे सेक्युलर म्हणून काम करत राहिला आहे. अर्थात, मध्यंतरीच्या काळात काँग्रेस अधिक शक्तीशाली झाल्यानंतर हा विचार, आपली तिसरी आघाडी निर्माण करून स्वतंत्र राजकीय वाटचाल करीत होता. परंतु, आणखी मधल्या काळात तिसरी शक्ती विघटित झाली.  काँग्रेस आणि भाजप या दोन तुल्यबळ पक्षांच्या दरम्यान जर मतभेद झाले तर काही वेळा हे पक्ष, कुठल्यातरी पक्षाच्या बाजूने लागत. काही वर्षांपूर्वी नितिश कुमार हे देखील भाजपच्या बाजूने गेले होते. परंतु, आज देशाची राजकीय, सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिक निकड पाहता राजकीय सत्ता बदलण्यासाठी समाजवादी विचार आणि चळवळी या एकसंघ होत आहेत. एक संघ होऊन त्या त्या प्रादेशिक पातळीवर तेथील सेक्युलर किंवा संविधानवादी पक्षांसोबत जुळून घेत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या इंडिया आघाडीसारख्या आघाडीचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ते घटक होऊ पाहताय, ही बाब महाराष्ट्राला देखील आज नवी आहे. म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकेकाळी महाराष्ट्रात अतिशय सनातन भूमिका घेऊन वावरत होती. त्यावेळी समाजवादी विचार आणि चळवळी शिवसेनेच्या विरोधात नेहमीच राहिला. परंतु, राजकीय परिवर्तन या मुद्द्याला घेऊन समाजवादी चळवळीला उद्धव ठाकरे यांची सोबत करणे, अधिक महत्त्वाचं वाटत आहे. त्यादृष्टीने समाजवादी चळवळीच्या २१ घटकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. अर्थात, राजकीय परिघामध्ये अशा घडामोडी अलीकडच्या काळात फार महत्त्वपूर्ण ठरत आहेत, ठरणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी समाजवादी चळवळींनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणे, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अर्थात, या सर्व गटांनी एकत्र येऊनही आपल्याला लोकसभेची एखादी जागा सोडावी, अशी साधी अपेक्षाही व्यक्त केली नाही. याचाच अर्थ समाजवादी चळवळ वैचारिक पातळीवर  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. राजकारणात कोणतीही गोष्ट सहजपणे होत नाही. असे असले तरी समाजवादी चळवळींच्या २१ गटांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका म्हणजे निस्वार्थपणे राजकीय तडजोड करण्याचा प्रकार आहे.  समाजवादी चळवळीचा निर्णय जो आहे, तो एकूणच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, याचे भान निश्चितपणे महाराष्ट्राला देखील आहे. समाजवादी चळवळीने एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी केलेली ही शक्ती, निश्चितपणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकींना प्रभावित करणारी आहे.

COMMENTS