Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

स्थायीच्या सभेत नगरसेविका वारेंनी केले निकम यांचे अभिनंदन

अहमदनगर/प्रतिनिधी ः मनपा स्थायी समितीचे नवे सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या दुसर्‍या सभेत मनपाच्या इतिहा

ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पहिला आठवडा कधी उजाडणार ?
संकलित कर थकबाकीचे पैसे आणा, नाहीतर दंडाला सामोरे जा…
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी ः मनपा स्थायी समितीचे नवे सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या दुसर्‍या सभेत मनपाच्या इतिहासाला अचंबित करणारी घटना घडली. मनपाचे अधिकारी व कर्मचारी नेहमी नगरसेवकांकडून शिव्यांचे धनी होतात, काहीवेळा मारही खातात. पण सोमवारी झालेल्या स्थायी समितीत काँग्रेस नगरसेविका रुपाली वारे यांनी चक्क मनपा पाणीपुरवठा विभाग प्रमुख यंत्र अभियंता परिमल निकम यांचे जाहीर आभार मानून त्यांचे अभिनंदनही केले…कारण होते…नव नागापूर येथून गेलेल्या मनपा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला बेकायदेशीरपणे घेतले गेलेले प्रत्येकी चार इंची चार पाणी कनेक्शन्स निकम यांनी तोडून बंद करून टाकले. कोणत्याही राजकीय दबावाची तमा न बाळगता निकम यांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन व या कारवाईमुळे सावेडीचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नसला तरी त्यात चांगला बदल मात्र झाला आहे, असे गौरवोदगारही यावेळी नगरसेविका रुपाली वारे यांनी व्यक्त केले.

स्थायी समितीची सोमवारी सकाळी बजेट सभा झाली व लगेच तासाभराने दुसरी सभा झाली. या सभेत पाणीपुरवठ्यातील विस्कळितपणावर सभापती कवडेंसह सभागृह नेते विनित पाऊलबुद्धे व अन्य नगरसेवकांनी आवाज उठवला. आमच्या प्रभागात घाण पाणीपुरवठा होत असून, पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी जमीन खांदायला मनपाकडून माणसे मिळत नाहीत. त्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिक बाहेरून विकतचे पाणी आणतात, असा उद्वेगही सभापती कवडेंनी व्यक्त केला. त्यावर अभियंता निकम यांनी उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाला पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सभापती कवडे यांनी उपायुक्त यशवंत डांगेंना याबाबत विचारले असता, आऊटसोर्सच्या लोकांच्या कामाची देयके देण्यासाठी पैसे नाहीत, ठेकेदारांची देयके आपण वेळेवर देऊ शकत नाही, म्हणून त्याच्याकडून लेबर कमी दिले जातात व त्यामुळे या कामात विस्कळितपणा आला आहे. जोपर्यंत मनपाचे आर्थिक सोर्स सुधारत नाहीत, तोपर्यंत हीच स्थिती राहील, अशी जाहीर कबुलीच त्यांनी देऊन टाकली. त्यानंतर डांगेसाहेब, काहीतरी करा, असे म्हणत सभापती कवडेंनी हा विषयच गुंडाळून टाकला. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने असलेला सभा अजेंड्यावरील शेवटचा विषय सभापती कवडेंनी मंजूर केला. यामुळे पाणीपुरवठा विभागाला 109 कर्मचारी मिळणार आहेत. मनपाने सहा महिने पैसे दिले नाही तर संबंधित लेबर कॉन्ट्रॅक्टर माणसे पुरवण्याचे थांबवणार नाही, असे त्याच्याकडून लेखी लिहून घ्या व मग त्याच्याशी करार करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी आवर्जून केली. स्वच्छता निधीतून डस्ट बीन व महिला-बालकल्याण विभागातील खेळणी सर्व प्रभागात दिल्या जाव्यात व 31 मार्चअखेरपर्यंत नगरसेवकांची याबाबतची मागणी घेऊन त्याची पूर्तता करावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

वारेंनी केले निकम यांचे कौतुक – पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या या चर्चेत नगरसेविका रुपाली वारे यांनी भाग घेत, जाहीरपणे यंत्र अभियंता परिमल निकम यांचे कौतुक केले. नव नागापूर येथील पाईपलाईनचे चार अनधिकृत टॅब कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता त्यांनी तोडले. त्यामुळे आमच्या सावेडी भागाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नसला तरी त्यात चांगले बदल घडून आले आहेत. तुम्ही असेच काम करा व अमृत पाणी योजनेचे पाणी आम्हाला मिळवून द्या. ते दिल्यावर आम्ही तुम्हाला पुन्हा जाहीर शुभेच्छा देऊ, असे वारे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सातपुतेंवर झाली सरबत्ती – याच सभेत एकीकडे पाणीपुरवठा विभाग प्रमुख निकम यांचे अभिनंदन होत असताना दुसरीकडे पाणीपुरवठा अभियंता रोहिदास सातपुते यांच्यावर मात्र भाजप नगरसेविका पल्लवी जाधव यांनी आरोपांची सरबत्ती केली. तुम्ही सन्माननीय सदस्यांचे फोन उचलत नाहीत, दुसर्‍या कोणाचा फोन आला तर सकाळी 11 वाजता तेथे हजर होता, पण आमचे फोन घेत नाहीत व पुन्हा फोन करून आमच्या परिसरातील पाणीपुरवठा समस्या सोडवण्यालाही प्राधान्य देत नाहीत, असा जाहीर आरोप जाधव यांनी केला. त्यावर, मी फोन घेतो व तुम्हालाही फोन केला होता, असा दावा सातपुतेंनी केला. पण तुम्ही खोटे बोलत आहात, हातातील कामे सोडून तुम्हाला फोन करायला आम्ही वेडे आहोत काय? असा उद्वेग जाधव यांनी व्यक्त केला. अखेर सभापती कवडे यांनी सातपुतेंना समज देत नगरसेविकांचे फोन घेत जा व त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या.

बाकड्यांसाठी आयुक्तांना भेटणार – आमच्या प्रभागात बाकडे मंजूर आहेत व ते आलेही आहेत. पण आयुक्त बसवण्यासाठी मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार नगरसेविका ज्योती गाडे यांनी केली. काहीजणांच्या प्रभागात मात्र बाकडे बसवली गेली आहेत, असा त्यांचा दावा होता. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून असा भेदभाव का केला जातो, असा सवाल सभापती कवडे यांनी केला व सर्वांना सारखा न्याय मिळावा आणि सर्वांच्या प्रभागात बाकडे बसवण्यासाठी स्थायीच्या सदस्यांसह आयुक्तांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, जुन्या मनपातील भोंगा काही तांत्रिक कारणाने बंद असल्याने तो जुन्या मनपासमोरील संत कैकाडी महाराज संकुलाच्या वर लावून तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही कवडे यांनी दिल्या.

COMMENTS