Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाने केली 8 पदाधिकार्‍यांची हकालपट्टी

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी
नेपाळ भूकंपाने हादरला, 6 जणांचा मृत्यू
आरक्षण यात्रा आणि ओबीसी !

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलेलं असताना आता राहुल कलाटे यांना मदत करणार्‍या शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह आठ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे आज चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो करणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाने चिंचवडमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि पक्षविरोधी काम करणार्‍यांची यादी त्यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शहराध्यक्ष सचिन भोसले आणि जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही मोठी कारवाई केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मदत करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना मदत करताना काही शिवसैनिक दोषी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्षादेशाविरोधात काम करत होते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यात राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचेच टेन्शन वाढवले आहे. दुसरीकडे राज्यभरात शिवसेनेची युती असणार्‍या वंचित बहुजन आघाडीने देखील राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने कलाटे यांचे पारडे  जड वाटत होते. या पार्श्‍वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही नेते आणि पदाधिकारी हे राहुल कलाटे यांचं काम करत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यानंतर ही हकालपट्टी करण्यात आली आहे.

COMMENTS