मुंबई/प्रतिनिधी : राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पेरण्या रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात मान्सूनचे आगमन
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पेरण्या रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शेतकर्यांनी काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे बी उगवू शकलेले नाही. त्यामुळे शेतकर्यांवर अनेक ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र पुढील पाच दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. सात आणि आठ जुलै रोजी काही ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस सामान्यदेखील असू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये या दोन्ही दिवशी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
अहमदनगर, नाशिक, सातारा, सांगली कोल्हापूरसह विविध जिल्ह्यात पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन होऊन काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण देशात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड पडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मान्सूनचा प्रवास अर्ध्या वाटेतच थांबला असून ही शेतकर्यांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली घटना नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे असतात. या काळात अनेकदा पाच ते दहा दिवसांचा खंड मान्सूनच्या पावसात पडतच असतो. मात्र मान्सून पूर्ण देशात पसरल्यानंतर आणि पवासाच्या सरींचा शिडकावा झाल्यानंतर काही आठवड्यांनी हा ब्रेक येतो. यावेळी मात्र पाऊस सुरू झाल्या झाल्या हा खंड पडल्यामुळं चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. देशातील विविध भागातील तापमानात यामुळे वाढ होत असून दिल्लीत 1 जुलै रोजी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात एवढं तापमान नोंदवलं जाण्याची गेल्या 9 वर्षांतली ही पहिली वेळ आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचे ढग पुढं सरकत नसल्याचं दिसून आलं आहे. पश्चिमेकडून जोरदार वाहणार्या उष्ण वार्यांमुळे पूर्वेकडून वाहणार्या मान्सूनच्या थंड वार्यांना पुढे सरकण्यात अडथळे येत असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. पश्चिमेकडून येणारे वारे हे मान्सूनला पुढे सरकण्यात अडथळा निर्माण करतात आणि त्यांचा प्रभावही कमी करत असल्याचे दिसून येत आहे. देशात 7 जुलैपर्यंत मान्सूनची हीच स्थिती राहिल, असे सांगण्यात येत आहे.
COMMENTS