टाळेबंदीची चर्चा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये काळजी व चिंतेची भावना निर्माण झाली आहे.
मुंबई/प्रतिनिदीः टाळेबंदीची चर्चा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये काळजी व चिंतेची भावना निर्माण झाली आहे. टाळेंबदीचा निर्णय झाल्यास किराणा, भाजीपाला, दूध मिळणार नाही या काळजीतून सुपर मार्केट, किराणा दुकानांसमोर मोठ्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. वास्तवात किराणा, भाजीपाला, दूध यांचा मुबलक साठा उपलब्ध असून, टाळेबंदी झाली, तरीही या वस्तूंचा पुरवठा खंडित होणार नाही, अशा शब्दांत व्यापार्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्त केले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीविषयी सूतोवाच केले आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी घाई सुरू केली आहे. गरजेपेक्षा दुप्पट, तिप्पट अधिक किराणा, धान्य खरेदी केले जात आहे. अतिरिक्त भाजीपाला खरेदी केला जात आहे; परंतु याची काहीही गरज नसल्याचे व्यापार्यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले, की सद्यस्थितीत सर्वप्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा आहे. खाद्यतेलाचा विचार केल्यास पाम व सोयाबीन तेलाची मुबलक आवक झाली आहे. संपूर्ण देशाला लागणारे 60 टक्के खाद्यतेल मुंबईतून पुरवले जाते. त्यासाठी गोदामे खाद्यतेलाने भरलेली आहेत. किमान चार ते सहा महिने पुरेल इतका हा साठा आहे. पुरवठा साखळीत कुठलीही अडचण नाही. हीच स्थिती धान्याचीदेखील आहे. भरपूर धान्य उपलब्ध आहे. जानेवारीत आलेला तांदळाचा नवीन साठा आता खाण्याजोगा होत असल्याने तो भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. गहू, ज्वारी यांचे नवीन पीक बाजारात येत आहे. डाळींचे उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे घबराट करण्यासारखी स्थिती नाही.
मुंबई शहर व परिसरात दररोज सुमारे 80 लाख लिटर दुधाची मागणी असते. यामध्ये सरकारी आरे व महानंदासह गोकूळ, वारणा, अमूल, मदर्स डेअरी, प्रभात तसेच परराज्यांतून येणार्या गोवर्धन आणि नंदिनी या ब्रॅण्डचा समावेश आहे. या कंपन्या मिळून जवळपास 45 लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात. उर्वरित 35 लाख लिटर दूध किरकोळ विक्रेत्यांकडून विकले जाते. टाळेबंदी लागू झाली, तरी दूध पुरवठ्यामध्येही खंड पडणार नाही. तुर्भे येथील दूध पॅकेजिंग कंपनीतील एका अधिकार्याने सांगितले, की परजिल्ह्यांतून होणारी दुधाची आवक सुरळीत आहे. गेल्या टाळेबंदीमध्येदेखील दुधाचा पुरवठा व्यवस्थितच होता. त्यामुळे आतादेखील चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
COMMENTS