बीड: उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेली ‘उत्कर्ष पर्यावरण वारी २०२६’ ही मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे

बीड: उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेली ‘उत्कर्ष पर्यावरण वारी २०२६’ ही मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे लाखो वारकऱ्यांपर्यंत ‘प्लास्टिकमुक्त वारी’ आणि ‘स्वच्छ वारी – हरित वारी’चा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. वारीदरम्यान स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती केली. यंदा उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून ५ लाख कापडी पिशव्या आणि ५ लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण वारकऱ्यांना करण्यात आले.
विशेष म्हणजे या कापडी पिशव्या फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या १ हजारांहून अधिक महिलांनी तयार केल्या होत्या. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी मिळाली.
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. दगडू लोंढे म्हणाले, “वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकतेची महान परंपरा आहे. या परंपरेला पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाची जोड देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्कर्ष पर्यावरण वारी ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि लोकसहभाग यांचा प्रभावी संगम आहे.”
ते पुढे म्हणाले की, “महिलांनी स्वतः तयार केलेल्या कापडी पिशव्यांमुळे त्यांना सन्मानजनक व शाश्वत रोजगाराची संधी मिळाली. समाज, शासन, स्वयंसेवक, दाते आणि वारकरी बांधवांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी झाला. सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर आधारित लोकहिताचे उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहतील.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरपूर नगरपरिषद, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, दाते, स्वयंसेवक, वारकरी आणि भाविकांचे फाउंडेशनच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. पर्यावरण रक्षणासोबत महिला सक्षमीकरणाचा आदर्श संदेश देणारी ही ‘उत्कर्ष पर्यावरण वारी’ संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

COMMENTS