Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयात ’अद्यावत रक्षा तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारत’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

बीड: नवगण शिक्षण संस्थेच्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग, रिसर्च अँड डेव्हलप

सिक्कीम बोगदा दुर्घटनेतील मृतांची संख्या २० वर; ५ जण अद्याप अडकले, मिथेन वायूमुळे बचावकार्याला अडथळे
इराण-अमेरिका युद्ध भडकले; अमेरिकेचे सलग ११ व्या दिवशी हल्ले, इराणकडून होर्मुज खाडी बंद; भारतावरही संकटाचे सावट
मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन

बीड: नवगण शिक्षण संस्थेच्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमिटी आणि सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २८ जुलै रोजी ’अद्यावत रक्षा तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) निवृत्त शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

श्री. देवधर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, संशोधनाची प्रक्रिया आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. न्यूटनच्या गतीच्या नियमांचा संरक्षण संशोधनातील उपयोग, तसेच स्वीडनकडून १९९६ मध्ये प्राप्त झालेल्या २६ किलो वजनाच्या शस्त्राचे दोन वर्षांच्या संशोधनातून १४ किलोपर्यंत वजन कमी करण्यात आलेल्या प्रकल्पाचा अनुभव त्यांनी सांगितला.

यावेळी त्यांनी भारताचे ’मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव, त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी, स्वदेशी बनावटीचा ‘अर्जुन’ रणगाडा, तसेच आज भारताने रणगाडे व अन्य लष्करी साहित्य निर्मितीत साधलेली आत्मनिर्भरता यावर प्रकाश टाकला. रडार, सोनार यंत्रणा, भूदल, नौदल आणि वायुदलात वापरल्या जाणार्‍या आधुनिक लष्करी उपकरणांची कार्यपद्धती, वैज्ञानिक तत्त्वे आणि त्यांचे महत्त्व याविषयीही त्यांनी सखोल माहिती दिली. “प्रथम देशाचा विचार, प्रत्येक काम देशासाठी” हा संदेश देत त्यांनी विविध संरक्षण उपकरणांवरील लघुपटही विद्यार्थ्यांना दाखविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणे ही मोठी संधी असल्याचे सांगत असे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक डोंगरे यांनी केले, तर आभार श्री. रुपेश कोकाटे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्या अनिता शिंदे, पदव्युत्तर विभागाचे संचालक डॉ. ए. जे. खान, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी कॅप्टन प्रा. बी. टी. पोटे, डॉ. बी. एम. सानप, प्रा. शिवाजी राऊत, प्रा. प्रदीप साळुंखे, प्रा. अनंता सोळुंके, प्रा. रवी बन, प्रा. काझी, प्रा. धनंजय बुरांडे आणि श्री. बालाजी चौरे यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणातील उपस्थिती हे या व्याख्यानाचे वैशिष्ट्य ठरले.

COMMENTS