बीड: युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार प्रेरित ’माय भारत’ (MY Bharat) बीड आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ब

बीड: युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार प्रेरित ’माय भारत’ (MY Bharat) बीड आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड येथे ’युवा शक्ती – नशामुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात संत श्री बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माय भारतचे जिल्हा नोडल अधिकारी सत्यजित संतोष, सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, प्राचार्य बळीराम राख आणि उपप्राचार्य डॉ. शंकर शिवशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘नशामुक्त, निरोगी आणि सशक्त भारत’ या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून लोकगीत गायन, नृत्य, पथनाट्य/मूकनाट्य, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील निर्मिती, घोषवाक्य लेखन आणि स्लॅम पोएट्री अशा एकूण आठ विविध कला व साहित्यिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यातून मुक्तीचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला.
स्पर्धांचे निष्पक्ष व पारदर्शक मूल्यमापन करण्यासाठी विविध महाविद्यालयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सादरीकरण, आशय, सर्जनशीलता आणि संदेशाच्या प्रभावीतेच्या आधारे विजेत्यांची निवड केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, हे विद्यार्थी पुढे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर विजेत्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश कोंका आणि डॉ. मनोजकुमार नवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

COMMENTS