Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत राजूरकरांची ’चाणक्यनीती’ ठरली निर्णायक? संगीता डक पाटील यांच्या विजयाची शहरात राजकीय चर्चा

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने जिल्हाभर दणदणीत यश मिळवून बँकेवर सत्ता प्रस्थापित केली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत अवघ्या ५५३ शेतकऱ्यांना दिलासा; तांत्रिक अडचणींमुळे विलंब: सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती
प्रशासनाचा ’कागदी’ उत्सव नि अन्यायाचा ’अदृश्य’ आक्रोश! किनवटमध्ये ’महसूल सप्ताहा’ची आतषबाजी; पण सामान्यांच्या पदरी लालफितीचा आणि लाचखोरीचा अंधार!

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने जिल्हाभर दणदणीत यश मिळवून बँकेवर सत्ता प्रस्थापित केली असली, तरी नांदेड मतदारसंघातील निकालाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. या मतदारसंघात बँक बचाव पॅनेलच्या संगीता डक पाटील यांनी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार अतुल वाघ यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अतुल वाघ यांना केवळ १२ मते मिळाली आहेत.

अतुल वाघ यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा आधीपासून होती. त्यांच्या आग्रहामुळेच अतुल वाघ यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जाते. त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण आणि डी. पी. सावंत यांनी त्यांच्या विजयासाठी व्यापक संपर्क मोहीम राबविल्याचेही राजकीय निरीक्षक सांगतात. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही अतुल वाघ यांना विजय मिळवता आला नाही.

याउलट, बँक बचाव पॅनेलच्या संगीता डक पाटील यांच्या विजयामागे विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या राजकीय रणनीतीचा प्रभाव असल्याची चर्चा नांदेड शहरात रंगू लागली आहे. संगीता डक पाटील यांना तब्बल ३३ मते मिळाल्यामुळे त्यांच्या पाठीमागे कोणाची अदृश्य शक्ती होती, याची आता उघड चर्चा होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने संगीता डक पाटील यांना उघडपणे समर्थन दिलेले नसले, तरी त्यांना ३३ मते मिळवून देण्यासाठी पडद्यामागून प्रभावी नियोजन, मतदारांशी संपर्क आणि स्थानिक पातळीवरील समन्वय साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संगीता डक पाटील यांच्या सक्रियतेकडेही अनेकजण वेगळ्या नजरेने पाहत आहेत. भविष्यातील विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्याविरोधात पर्यायी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने काही राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चांनाही या निकालामुळे बळ मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केलेल्या या प्रयत्नांकडे आता खासदार अशोकराव चव्हाण कोणत्या दृष्टीने पाहतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर भाजपमध्ये डी. पी. सावंत आणि आमदार अमरनाथ राजूरकर या दोन प्रभावी गटांतील मतभेद पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक संपली असली, तरी तिचे राजकीय पडसाद आगामी काळात नांदेडच्या राजकारणात अधिक तीव्रतेने उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS