Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार; आरोग्य अन् शिक्षण विभागातील घोटाळ्यांवर ‘सीईओ’ महेश पाटलांचे मौन!

नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेच्या कारभारात सध्या प्रचंड सावळ गोंधळ माजला असून प्रशासकीय प्रमुखांच्या निष्क्रियतेमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे

मेळघातात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बालिकेच्या पोटावर दिले चटके!
पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी उपाययोजना करा; आमदार आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेच्या कारभारात सध्या प्रचंड सावळ गोंधळ माजला असून प्रशासकीय प्रमुखांच्या निष्क्रियतेमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश पाटील यांनी कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनात पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध विभागांची पाहणी करत बैठकांचा सपाटा लावला अन् शिस्तबद्ध कामकाजाचा आव आणला. मात्र, अवघ्या काही दिवसांतच हा उत्साह मावळला असून, सध्या आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत संवेदनशील विभागांमध्ये भ्रष्टाचाराचा व अनागोंदीचा कहर पाहायला मिळत आहे.

आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी अशोक निम्मलवार यांच्याविरोधात विविध गंभीर तक्रारी आल्यानंतर तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने सखोल चौकशीअंती निम्मलवार यांना दोषी ठरवत त्यांचा पदभार काढून घेण्याची आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार करण्याची स्पष्ट शिफारस केली होती. मात्र, हा चौकशी अहवाल प्राप्त होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित अधिकार्‍यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागातील निष्पाप अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

दुसरीकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कथित त्रासाला व मनमानी कारभाराला कंटाळून प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना थेट निवेदन देऊन फुटाणे यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी ५ ऑगस्टपासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिल्याने जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापले आहे. असे असतानाही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अद्याप कोणतीही मध्यस्थी किंवा तोडगा काढलेला नाही.

शिक्षणाधिकार्‍यांच्या वर्तनामुळे हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील शिक्षक सुनील मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तसेच हदगावचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे आणि केंद्र प्रमुख पवळे हेदेखील त्रस्त आहेत. उमरी तालुक्यातील आमदुरा येथील गोदावरी नदीत दोन मुलांचा खून करून स्वतः उडी घेऊन आत्महत्या केलेले शिक्षक आणि शिक्षणाधिकार्‍यांमधील वादाचा संदर्भही समोर आला आहे.

एवढे गंभीर प्रकार घडल्यानंतर आणि पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याच्या चर्चा असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मौन धारण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या या ‘आंधळ्या कारभारामुळे’ जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य नागरिक, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून, प्रशासनातील ही अनागोंदी कधी थांबणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS