पारनेर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात बुधवारी (दि. २९ जुलै) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास बोलेरो पिकअप (क्र. एमएच १५

पारनेर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात बुधवारी (दि. २९ जुलै) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास बोलेरो पिकअप (क्र. एमएच १५ जेडब्ल्यू २८०४) वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका ३० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप वाहनातून काही कामगार प्रवास करत असताना वासुंदे चौकातील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की वाहनातील अनेक जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले.
या अपघातात तुषार भगवान भोसले (वय ३०, रा. दुबेर, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अपघातात सुनील रामदास बोडके (रा. नाशिक), रवी कैलास शिंदे (रा. शिंदेगाव, जि. नाशिक), रविराज पाटील (रा. कर्नाटक), सोनू इंद्रबहादुर सिंग (रा. उत्तर प्रदेश), राम गंगाराम रच्छा (रा. उत्तर प्रदेश) आणि कांतीलाल प्रभाकर गांगुर्डे (रा. पंचकेश्वर, ता. निफाड, जि. नाशिक) हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट रोकडे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS