अहिल्यानगर: पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहास

अहिल्यानगर: पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोयना जलसागरास यापूर्वी ‘शिवाजी जलसागर’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव कोयना जलाशयाला देण्यात यावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून सातत्याने होत होती.
जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विशेष पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलाशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार महायुती सरकारने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करून कोयना जलसागराचे नाव “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. जलसागराचे नामांतर करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी आणि जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS