छत्रपती संभाजीनगर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (IIIT Nagpur) येथील विद्यार्थी अपूर्व मुंदडा यांची विद्यार्थी प्रशासन पर

छत्रपती संभाजीनगर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (IIIT Nagpur) येथील विद्यार्थी अपूर्व मुंदडा यांची विद्यार्थी प्रशासन परिषद निवडणूक २०२६-२७ मध्ये ‘महासचिव’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे.
अपूर्व मुंदडा हे छत्रपती संभाजीनगर (पैठण) येथील ज्येष्ठ पत्रकार, ‘विक्रांत टाईम्स’ आणि ‘अग्रसेन टाईम्स’चे संपादक अरुणकुमार एस. मुंदडा यांचे सुपुत्र आहेत. पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि लोकहिताची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील अपूर्व यांनी आपल्या गुणवत्ता, नेतृत्वक्षमता आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थी नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आयआयआयटी नागपूरच्या निवडणूक समितीने जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार, २८ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक इमारतीतील परिषद सभागृहात सर्व उमेदवार आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे निकाल संस्थेच्या ऑनलाईन माध्यमांवरही प्रसिद्ध करण्यात आले. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून लोकशाही मूल्यांवर आधारित, शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला यशस्वी केले.
सध्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले अपूर्व मुंदडा हे केवळ अभ्यासातच नव्हे, तर नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधण्याच्या वृत्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रखर बुद्धिमत्ता, अपार मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि अत्यंत मनमिळावू स्वभाव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यापक विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले असून, महासचिवपदासाठी त्यांची निवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यक्षमतेचा गौरव मानली जात आहे.
तंत्रज्ञान शिक्षणासोबतच विद्यार्थी कल्याण, शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम, नवोपक्रम आणि संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी आता अपूर्व यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रशासन परिषद अधिक परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्री कार्य करेल, असा विश्वास विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे.
अपूर्व मुंदडा यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. विक्रांत टाईम्स आणि अग्रसेन टाईम्स परिवारातर्फे अपूर्व मुंदडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि नेतृत्वपूर्ण वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS