Homeताज्या बातम्या

शेळ्या चोरी करणारी कुख्यात टोळी बीड एलसीबी पथकाकडून जेरबंद; स्विफ्ट कारसह ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड: जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या शेळ्या चोरीच्या घटनांना अखेर आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाला मोठे यश आले आहे. वडवणी पो

कारगिल विजय दिनी शेवगावात शासकीय उदासीनता; देशासाठी लढलेल्या माजी सैनिकांचा तीव्र संताप
सोलापूरमधील ‘सद्गुरू बसवारूढ महास्वामींचा मठ’ उडवून देण्याची धमकी; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव

बीड: जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या शेळ्या चोरीच्या घटनांना अखेर आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाला मोठे यश आले आहे. वडवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शेळ्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एलसीबीने कुख्यात आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वडवणी, धारूर, नेरूर आणि तलवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा शेळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३१/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

तपास सुरू असतानाच २५ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विष्णू यांचे पथक नियमित गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. शेळ्या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष किसन विटकर (रा. गांधीनगर, बीड) हा आपल्या साथीदारांसह खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानात थांबला असल्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत सुभाष किसन विटकर, बेग रशीद बेग (रा. बलभीम चौक, बीड) आणि इम्रान चांद शेख (रा. तेलगाव नाका, बीड) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर आरोपींनी वडवणी, धारूर, नेरूर आणि तलवाडा परिसरातून दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली.

चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले सहा शेळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही गुन्ह्यांबाबतही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वडवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या टोळीने इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विष्णू, पोलीस हवालदार बापूसाहेब घोडके, दिलीप गिते, दीपक खाडेकर, नगर पठाण, अर्जुन यादव तसेच चालक गणेश मराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शेळीपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागात वारंवार घडणार्‍या पशुधन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS