बीड: आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा एकंदरीत वावर पाहता डॉक्टर्स आता निव्वळ व्यापारी झाले असून त्यांनी थाटलेल्या खाजगी दवाखान्यांचा

बीड: आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा एकंदरीत वावर पाहता डॉक्टर्स आता निव्वळ व्यापारी झाले असून त्यांनी थाटलेल्या खाजगी दवाखान्यांचा बाजार तेजीत आल्याचे गंभीर वक्तव्य मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ़ यांनी केले आहे.
डॉक्टर्स ज्यांना रुग्णांसाठी ईश्वराचे रूप मानले जाते, त्यांच्यात आता फार मोठा बदल झाला आहे. याचा प्रत्यय बीड जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दररोज येत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर स्वतःचे छोटे क्लिनिक उघडून प्राथमिक उपचार करायचे व गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवायचे. मात्र, आता चित्र उलट झाले असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वतःची मोठमोठी हॉस्पिटल्स उघडून बसले आहेत. रुग्णालयात कर्तव्यावर असतानाच तेथील रुग्ण स्वतःच्या खाजगी रुग्णालयांमध्ये पळवून नेले जात आहेत.
कमिशनवर एजंट आणि दलालांचे जाळे
रुग्ण पळवताना आपण संशयाच्या भोवऱ्यात येऊ नये म्हणून काही डॉक्टरांनी टापटीप राहणारे एजंट आणि दलाल कमिशनवर ठेवले आहेत. हे दलाल जिल्हा रुग्णालयात स्वतः डॉक्टर असल्यासारखे वावरतात. त्यांच्या थाटाला भुलून ग्रामीण व शहरी भागातील भोळेभाबडे रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि संबंधित डॉक्टरांच्या महागड्या खाजगी रुग्णालयांत पोहचतात.
पूर्वीचे डॉक्टर रुग्ण कमीत कमी खर्चात व वेळेत बरा व्हावा यासाठी प्रयत्न करायचे. मात्र, आजकालचे डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कितीही कायदे किंवा कलमे लावली तरी काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे मौन
जिल्हा शल्यचिकित्सक वगळता बहुतांश डॉक्टरांची स्वतःची दिमाखदार खाजगी हॉस्पिटल्स सुरू आहेत. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धाडस जिल्हा शल्यचिकित्सक, उच्चपदस्थ अधिकारी किंवा सत्ताधारी कोणीही दाखवत नाहीत. विशेष म्हणजे विरोधी पक्षही या मुद्द्यावर गप्प असल्याने ही बाब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अत्यंत मारक ठरत असल्याचे एस. एम. युसूफ़ यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS