नांदेड: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने २७ वा कारगिल विजय दिवस सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात

नांदेड: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने २७ वा कारगिल विजय दिवस सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व माजी सैनिक, शहीद जवानांचे नातेवाईक तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणार्या शूर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्यगाथेला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने शहीद सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच देशसेवेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.
विशेषतः १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांमध्ये देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सैनिकांविषयी आदराची भावना अधिक दृढ व्हावी, समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची ज्वलंत ऊर्जा कायम राहावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी २६ जुलै रोजी देशभर कारगिल विजय दिवस साजरा करून कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्याच अनुषंगाने नांदेड येथे आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शूर वीरांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

COMMENTS