भोकर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोकर आगारासाठी ’राजमाता जिजाऊ’ या नावाने पाच नवीन बस उपलब्ध झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा
भोकर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोकर आगारासाठी ’राजमाता जिजाऊ’ या नावाने पाच नवीन बस उपलब्ध झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या नव्या बसमुळे भोकर परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
भोकर आगारात दाखल झालेल्या या पाचही बसांमध्ये प्रत्येकी 55 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, मेट्रोप्रमाणे पुढील थांब्याची ध्वनिव्यवस्थेद्वारे माहिती देणारी सुविधा देखील उपलब्ध आहे. या बस प्रामुख्याने भोकर-नांदेड आणि भोकर-नरसी या मार्गांवर धावणार आहेत. लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी सांगितले की, खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर येथे लवकरच भव्य व अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येणार असून, परिसराचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासात आणि वैभवात मोठी भर पडेल. नव्याने उपलब्ध झालेल्या पाच बसांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे, आगार प्रमुख संजय पुंडगे, शहराध्यक्ष विशाल माने, गटनेते विठ्ठल पाटील धोंडगे, नगरसेवक प्रतिनिधी गणेश यशवंतकर, डॉ. मनोज गिमेकर, गौतम कसबे, अविनाश वाघमारे, सिद्धेश्वर पिटलेवाड, आकाश गेंटेवाड, अमोल शहांगटवार, बी. एस. सरोदे, श्रीदत्त चटलावार, संजय सोनाळे, पी. जी. साखरे, प्रणव कारागीर, गणेश माळे, यु. पी. कदम, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह आगारातील चालक, वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या बसांची पाहणी केली तसेच आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या बसमध्ये बसून आनंद व्यक्त केला. नवीन बससेवेच्या माध्यमातून भोकर आगाराच्या प्रवासी सेवेला नवी गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS